Jay Shah Prediction On Team India: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघाने टी-20 वर्ल्डकप जिंकत इतिहास रचला आहे. भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 29 जूनला ब्रिजटाऊनच्या केसिंग्टन ओव्हलमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. याआधी भारताने 2007 मध्ये टी-20 वर्ल्डकप जिंकला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या विजयासह बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी  केलेली भविष्यवाणी खऱी ठरली आहे. जय शाह यांनी विराट कोहली बार्बाडोसच्या मैदानावर झेंडा रोवेल असं म्हटलं होतं. भारताच्या विजयानंतर रोहित शर्माने खऱोखर मैदानात तिरंगा रोवला होता. 


त्यातच आता जय शाह यांनी नवी भविष्यवाणी केली आहे. भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात पुढील वर्षी चॅम्पिअन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपची फायनल जिंकेल असं जय शाह म्हणाले आहेत. जय शाह यांच्या विधानावरुन रोहित शर्माच चॅम्पिअन्स ट्रॉफीत भारतीय संघाचं नेतृत्व करेल हे स्पष्ट झालं आहे. चॅम्पिअन्स ट्रॉफीत 50 ओव्हर्स खेळल्या जातात. रोहितने टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र इतर दोन फॉरमॅटमध्ये अद्याप तोच कर्णधार आहे. 



जय शाह यांनी व्हिडीओ शेअर केला असून त्यात म्हटलं आहे की, "'या ऐतिहासिक विजयासाठी टीम इंडियाचे खूप खूप अभिनंदन. मला हा विजय प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांना समर्पित करायचा आहे. गेल्या वर्षभरातील आमची ही तिसरी फायनल होती. जून 2023 मध्ये, आम्ही जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत हरलो. नोव्हेंबर 2023 मध्ये दहा विजयानंतर आम्ही मन जिंकले, पण चषक जिंकू शकलो नाही".


पुढे ते म्हणाले की, "मी राजकोटमध्ये सांगितले होतं की जून 2024 मध्ये आम्ही मन जिंकू, चषक जिंकू आणि भारतीय तिरंगा रोवू आणि आमच्या कर्णधाराने ध्वज रोवला. या विजयात शेवटच्या पाच षटकांचा मोठा वाटा होता. या योगदानाबद्दल मी सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्या यांचे आभार मानू इच्छितो. या विजयानंतर WTC फायनल आणि चॅम्पियन्स ट्रॉफी हे लक्ष्य आहे. मला पूर्ण विश्वास आहे की रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आम्ही या दोन्ही स्पर्धांमध्ये चॅम्पियन बनू".


आता रोहित शर्माचं लक्ष्य आपल्या संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये विजेतेपद मिळवून देण्याचे असेल. त्यानंतर जून 2025 मध्ये लॉर्ड्स येथे होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची (WTC) फायनल जिंकण्याचाही प्रयत्न असेल. मात्र, WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला आगामी न्यूझीलंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करावी लागेल.