मुंबई : भारतीय टीम गेल्या अनेक मालिकांपासून सातत्याने यशस्वी कामगिरी करत आहे. या सातत्यपूर्ण कामगिरीत जितके योगदान बॅट्समनचे आहे, तितकेच बॉलरचेही आहे. याआधी भारताची कमकुवत बॉलिंग ही कमकुवत समजली जायची. पण भारताचे बॉलर गेल्या अनेक सीरिजपासून चांगली कामगिरी करत आहेत. त्यापैकी एक म्हणजेच भुवनेश्वर कुमार. भुवनेश्वर कुमारचा आज २९ वा वाढदिवस आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


क्रिकेट कारकीर्द 


भुवनेश्वर कुमारमुळे भारताची बॉलिंग आणखी मजबूत झाली. सुरुवातीच्या काही काळात भुवनेश्वर आपल्या स्पेलची चांगली सुरुवात करायचा आणि डेथ ओव्हरमध्ये बचावात्मक पद्धतीने बॉलिंग करायचा. गेल्या वर्षभरात भुवनेश्वरच्या कामगिरीत चढउतार पाहायला मिळाले. भुवनेश्वरला सीरिजच्या प्रत्येक सामन्यात खेळवले जातेच असे नाही. त्याऐवजी नवख्या किंवा दुसऱ्या बॉलरला संधी दिली जाते. तरीसुद्धा ज्या सामन्यात त्याला संधी दिली जाते, त्यात तो १०० टक्के कामगिरी करतो. या कामगिरीने भुवनेश्वरनं कर्णधाराचा आणि निवड समितीचा विश्वास सार्थ ठरवला आहे. 


भुवनेश्वर कुमार चांगल्या फॉर्ममध्ये असल्यावर आणि खेळपट्टीतून मदत मिळत असल्यास तो फार आक्रमक बॉलिंग करतो आणि विरुद्ध टीमला झटके देतो. अशातच त्याला बॉल दोन्ही बाजूला फिरवण्याचे तंत्र अवगत आहे. 


सचिनची विकेट


एक बॉलर म्हणून सचिनची विकेट घ्यावी अशी इच्छा प्रत्येकाची असते. भुवनेश्वर कुमारने सचिनची विकेटच घेतली नाही, तर त्याला शून्यावर बाद केले. रणजी ट्रॉफीच्या २००८-०९ च्या मोसमात मुंबई आणि उत्तर प्रदेश यांच्यात अंतिम सामना झाला. या सामन्यात भुवनेश्वरने सचिन तेंडुलकरला शून्यवर आऊट केलं. त्यावेळेस भुवनेश्वर चांगल्याच चर्चेत आला होता. विशेष म्हणजे, प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये शून्यावर बाद होण्याची सचिनची ती पहिलीच वेळ होती. सचिनची विकेट घेतल्याने, भुवनेश्वरचे स्वप्न पूर्ण झाले.


एकदिवसीय कारकीर्द


भुवनेश्वर कुमारने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३० डिसेंबर २०१२ ला पाकिस्तान विरुद्ध पदार्पण केले. पदार्पण करत असलेल्या बॉलरला आपला पहिला सामना आयुष्यभर स्मरणात राहावा, अशीच इच्छा असते. भुवनेश्वर कुमारनंही त्याच्या पहिल्या सामन्यात अशीच कामगिरी केली. त्याने एकदिवसीय कारकिर्दीतील पहिल्याच बॉलवर विकेट घेण्याची कामगिरी केली. या सामन्यात भुवनेश्वरने ९ ओव्हरमध्ये २७ रनच्या मोबदल्यात २ विकेट घेतल्या आणि ३ मेडन ओव्हर टाकल्या. यानंतर भुवनेश्वरने मागे वळून पाहिले नाही. त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केले. विशेष म्हणजे त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मिळवलेली पहिली विकेट ही बोल्ड करुनच मिळवली. त्याने टी-२० मध्ये पाकिस्तानच्या नासिर जमशेदला, वनडेत मोहम्मद हाफिजला तर टेस्टमध्ये डेविड वॉर्नरला बोल्ड केले.


हा अनोखा विक्रम


भुवनेश्वर कुमारच्या नावे अनोखा विक्रम आहे. हा विक्रम करणारा तो एकमेव बॉलर आहे. भुवनेश्वरने टी-२०, वनडे आणि टेस्ट या तिन्ही प्रकारात प्रत्येकी ५ विकेट घेतल्या आहेत. हे रेकॉर्ड आत्तापर्यंत भारताच्या कोणत्याच बॉलरला करता आलं नाही. टी-२० मध्ये पाच विकेट घेणारा युजवेंद्र चहाल हा पहिला भारतीय गोलंदाज आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर भुवनेश्वर कुमार आहे.


सलग दोनदा पर्पल कॅप 


आयपीलच्या सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. ही कॅप भुवनेश्वरने दोनदा मिळवली आहे. भुवनेश्वरने २०१६ आणि २०१७ च्या आयपीएलच्या हंगामात पर्पल कॅप मिळवली.