भारत-पाकिस्तान बॉर्डरवर क्रिकेट स्टेडियम बांधण्याचा सल्ला! एक गेट भारताकडून आणि...
Stadium At Indian Pakistan Border: भारत आणि पाकिस्तान यापूर्वी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमध्ये एकमेकांसमोर आले होते. हा सामना भारताने 6 धावांनी जिंकलेला.
Stadium At Indian Pakistan Border: काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले. भारताचे सामने पाकिस्तानबाहेर होणार हे स्पष्ट झालं असून वेळापत्रक समोर आल्यापासून चॅम्पियन्स ट्रॉफी पुन्हा चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे यजमानपद पाकिस्तानकडे राहणार का यावरुन मागील काही महिन्यांपासून वाद सुरु होता. मात्र आता भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही हे स्पष्ट झालं आहे. आयसीसीने हायब्रीड मॉडेलला परवानगी दिल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने ते स्वीकारलं आहे.
दीड दशकाहून अधिक काळापासून भारतीय संघ पाकिस्तानात गेलाच नाही
2024 ते 2027 दरम्यान खेळवण्यात येणाऱ्या आयसीसीच्या स्पर्धांमधील भारत-पाकिस्तान सामने दोघांपैकी कोणत्याही एका देशात खेळवले जाणार नसून त्रयस्त देशात खेळवले जातील, असं निश्चित करण्यात आलं आहे. दोन्ही देशांमध्ये असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील दीड दशकाहून अधिक काळापासून भारताने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाबरोबर आजी-माजी खेळाडूंकडूनही अनेकदा भारताने पाकिस्तान दौऱ्यावर यावं अशी विधानं थेट किंवा अप्रत्यक्षपणे करण्यात आली.
पाकिस्तानसाठी ही वाईट बातमी
मात्र आता पाकिस्तानमध्ये भारतीय संघ जाणार नाही हे समोर आल्यानंतर पाकिस्तानचा क्रिकेटपटू अहमद शेहजादने ही पाकिस्तानसाठी वाईट बातमी असल्याचं म्हटलं आहे. युट्यूबवर बोलताना अहमद शेहजादने, "पाकिस्तानकडे भारतीय संघासाठी यजमान होण्याची ही सुवर्णसंधी होती. 2021 मध्ये सर्व देशांच्या क्रिकेट मंडळांनी पाकिस्तानच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा यजमान असेल यावर सहमती दर्शवली होती. आता आयसीसी अशी माघार घेऊ शकत नाही. मला वाटतं पाकिस्तानने ही संधीही गमावली आहे. आता भारतीय संघ पाकिस्तानमध्ये कधीच येणार नाही. आता आपण भारतीय संघ पाकिस्तान येण्याची आस सोडून दिली पाहिजे. तुम्ही भारतीय संघाला केवळ आयसीसीच्या स्पर्धांच्या माध्यमातून आणू शकता," अशी आठवण करुन दिली आहे.
बॉर्डरवर बांधा स्टेडियम
भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार नाही हे समजल्यानंतर नाराज झालेल्या अहमद शेहजादने एक अजब सल्ला दिला आहे. भारत आणि पाकिस्तानच्या अंतरराष्ट्रीय सीमेवर स्टेडियम बांधावे असा सल्ला अहमद शेहजादने दिला आहे. या स्टेडियमचं एक गेट पाकिस्तानमध्ये आणि दुसरं भारतात असावं असंही पाकिस्तानचा हा क्रिकेटपटू म्हणाला आहे. "सीमेवर स्टेडियम बांधण्याचा सल्ला मी एका पॉडकास्टमध्ये दिला होता. एक गेट भारतात आणि दुसरं गेट पाकिस्तानच्या दिशेने असेल. दोन्ही देशांचे खेळाडू आपआपल्या देशाच्या बाजूला असलेला गेटमधून स्टेडियममध्ये प्रवेश करतील आणि खेळतील. मात्र यामध्येही बीसीसीआय आणि सरकारला अडचण असेल. त्यांचे खेळाडू आपल्या बाजूच्या दिशेने मैदानात फिल्डींगला येतील तेव्हा त्यांना व्हिजा लागेल. जो त्यांना दिला जाणार नाही," असं अहमद शेहजाद म्हणाला.
पाकिस्तानने केलेलं भारताला पराभूत
यापूर्वी 2017 साली झालेल्या अखेरच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभूत केलं होतं. पाकिस्तान हे चॅम्पियन्स ट्रॉफीचे विद्यमान विजेते आहेत.