मुंबई : कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईमध्ये प्रत्येक जण आपलं योगदान देत आहे. भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी मंगळवारी पीएम केयर्स फंडला ५९ लाख रुपयांची देणगी दिली आहे. याशिवाय चेतेश्वर पुजारानेही पीएम केयर्स फंडाला मदत केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनिल गावसकर यांनी केलेल्या या मदतीची माहिती दिली नाही, पण मुंबईचा माजी क्रिकेटपटू अमोल मुजुमदारने ट्विट करुन गावसकर यांनी मदत केल्याचं सांगितलं. 'एसएमजी (सुनिल मनोहर गावसकर) यांनी कोव्हिड राहत कोषसाठी ५९ लाख रुपये दान केल्याचं समजलं, यातले ३५ लाख रुपये पीएम केयर्स फंडासाठी तर २४ लाख रुपये महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आले,' असं ट्विट मुजुमदारने केलं आहे.



दुसरीकडे विराट कोहली, चेतेश्वर पुजारा यांनी त्यांनी केलेल्या मदतीची आकडेवारी जाहीर केलेली नाही. बाकीच्या क्रिकेटपटूंमध्ये इरफान पठाण आणि युसुफ पठाण या बंधूंनी गरजूंना १० हजार किलो तांदूळ आणि ७०० किलो बटाटे दिले.


भारताचा माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने गरजूंसाठी ५० लाख रुपयांचे तांदूळ दान करण्याचा निर्णय घेतला. अजिंक्य रहाणेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १० लाख रुपये दिले. तर बीसीसीआयने पंतप्रधान सहाय्यता फंडाला ५१ कोटी रुपयांची मदत केली.


सौरव गांगुलीने याशिवाय कोलकाता इस्कॉनच्या मदतीने जवळपास २० हजार गरजूंना अन्नदान केलं. इस्कॉन कोलकात्याचे प्रवक्ता आणि उपाध्यक्ष राधारमण दास म्हणाले, 'कोलकात्यामध्ये प्रत्येक दिवशी १० हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करणाऱ्या सौरव गांगुली यांना धन्यवाद. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इस्कॉन कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहे. दादाची ही सर्वोत्तम खेळी आहे. आम्ही त्यांना धन्यवाद देतो.'


इस्कॉन संपूर्ण देशात जवळपास ४ लाख गरजूंना अन्न देत आहे. याआधी सौरव गांगुलीने रामकृष्ण मिशनचं मुख्यालय असलेल्या बेलूर मठामध्ये २० हजार किलो तांदूळ दान केले होते.