सचिनच्या वाढदिवसालाच ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाचा खोळसाडपणा
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आज ४५ वर्षांचा झालाय.
मुंबई : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आज ४५ वर्षांचा झालाय. जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. पण आजच्याच दिवशी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं खोडसाळपणा केला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं सचिनचा एक व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर शेअर केला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर डेमियन फ्लेमिंगनं सचिनला बोल्ड केलेला हा व्हिडिओ क्रिकेट ऑस्ट्रेलियानं त्यांच्या फेसबूक आणि ट्विटर पेजवर शेअर केला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं शेअर केलेल्या या व्हिडिओनंतर त्यांच्यावर सचिनचे चाहते टीका करत आहेत. सचिनबरोबरच डेमिअन फ्लेमिंगचाही आज वाढदिवस आहे. डेमिअन फ्लेमिंग आज ४८ वर्षांचा झाला आहे.
फ्लेमिंगकडून सचिन ७ वेळा आऊट
डेमिअन फ्लेमिंगनं वनडे आणि टेस्ट क्रिकेट मिळून ७ वेळा सचिनला आऊट केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर ब्रेट लीनं सर्वाधिक वेळा म्हणजेच १४ वेळा सचिनची विकेट घेतली. ग्लेन मॅकग्राथनं १३ वेळा आणि जेसन गिलेस्पीनं ८वेळा सचिनची विकेट घेतली.
आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३४३५७ धावा केल्या. त्याच्या नावावर कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्डही आहे. त्याने वनडेत १८४२६ आणि कसोटीत १५९२१ धावा केल्यात. २४ एप्रिल १९७३मध्ये एक वाजता मुंबईत सचिनचा जन्म झाला.