U-19 World Cup 2024: आयसीसी अंडर-19 पुरुष वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला 19 जानेवारीपासून सुरुवात झाली. या स्पर्धेने क्रिकेट जगताला अनेक स्टार खेळाडू दिला. युवराज सिंह (2000), रोहित शर्मा (2006), विराट कोहली आणि रवींद्र जडेजा (2008), ऋषभ पंत आणि ईशान किशन (2016), शुभमन गिल (2018) असे अनेक फलंदाज टीम इंडियाला मिळाले आहेत. पण असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांना अंडर-19 विश्वचषकात चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात जागा पटकावता आली नाही. यात उन्मुक्त चंद, रविकांत शुक्ला, मनीष पांडे, यश धुल आणि कमलेश नागरकोटी या खेळाडूंचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युवा ब्रिगेडचं मिशन वर्ल्ड कप
टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडचं मिशन वर्ल्ड कपला (Mission World Cup) शनिवारपासून सुरुवात होणार आहे. पंजाबचा उदय सहारन अंडर-19 टीम इंडियाचं (Team India) नेतृत्व करणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना शनिवारी बांगलादेशविरुद्ध (India vs Bangladesh) खेळला जाणार आहे. ग्रुप-ए मध्ये भारताशिवाय बांगलादेश, अमेरिका आणि आयर्लंड संघांचा समावेश आहे. 11 फेब्रुवारीला अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत 16 संघांचा समावेश असून चार ग्रुपमध्ये प्रत्येकी चार संघांचा समावेश असणार आहे. प्रत्येक्य ग्रुपमधील अव्वल दोन संघ सुपर सिक्समध्ये पोहोचतील. यात प्रत्येकी सहा संघांचे दोन ग्रुप बनवण्यात येतील. दोन्ही ग्रुपमधले अव्वल दोन संघ सेमीफायनलमध्ये एन्ट्री करतील. दक्षिण आफ्रिकेतल्या बेनोनीमध्ये 6 आणि 8 फ्रेब्रुवारील सेमीफायनलचे सामने खेळवले जातील. 


युवा ब्रिगेडकडे लक्ष
अंडर-19 विश्वचषक स्पर्धेपूर्वी झालेल्या एशिया कप स्पर्धेत टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक झाली होती. सेमीफायनलमध्ये टीम इंडियाला बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला होता. पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आलेल्या त्रिकोणी मालिकेत भारताने दमदार कामगिरी केली. भारत, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश होता. या स्पर्धेत भारताने सर्व सामने जिंकले. पण पावसामुळे अंतिम सामना होऊ शकला नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिकेला संयुक्त विजेतेपद जाहीर करण्यात आलं. 


टीम इंडियाच्या युगा ब्रिगेडचा प्रमुख आकर्षण असणार आहे तो अर्शिन कुलकर्णी. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सने अर्शिन कुलकर्णीला आपल्या संघात घेतलं आहे. महाराष्ट्र प्रीमिअर लीगमध्ये अर्शिनने 9 षटकार लगावत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. चार संघांच्या मालिकेत अर्शिन कुलकर्णीने 93 चेंडूत 163 धावा ठोकल्या होत्या. 


याशिवाय कूच बिहार ट्ऱ़ॉफीत प्लेअर ऑफ द टूर्नामेंट राहिलेल्या मुशीर खान आणि कर्णधार उदय सहारनवरही मदार असणार आहे. गोलंदाज राज लिम्बानीने नुकतंच नेपाळविरुद्ध सात विकेट घेण्याची कामगिरी केली होती. तर उपकर्णधार सौम्य पांडेने अफगाणिस्तानिविरुद्ध सहा विकेट घेतल्या होत्या. 


टीम इंडिया सर्वात यशस्वी संघ
अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासत टीम इंडिया सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 असे तब्बल पाच वेळा टीम इंडियाने अंडर-19 विश्वचषकावर नाव कोरलं आहे. याशिवाय 2016 आणि 2020 मध्ये टीम इंडिया उपविजेती ठरली होती. आता सहाव्यांदा अंडर-19 विश्वचषक जिंकण्यासाटी टीम इंडिया सज्ज झाली आहे. 


भारतीय संघ : उदय सहारन (कर्णधार), अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंह, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशु मोलिया, मुशीर खान, अरावेली अवनीश राव (विकेटकीपर), सौम्य कुमार पांडे (उपकर्णधार), मुरुगन अभिषेक, इनेश महाजन (विकेटकीपर), धनुष गौडा, आराध्य शुक्ला, राज लिम्बानी, नमन तिवारी.