Liquor Bottles recovered from Indian U-23 Team : भारतीय क्रिकेटमध्ये घडलेल्य एका घटनेने खळबळ उडाली आहे. सौराष्ट्रच्या 23 वर्षाखालील (Saurashtra U-23 Team) खेळाडूंच्या किट बॅगमध्ये चक्क दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. विमानतळावर दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून याप्रकरणी सौराष्ट्र क्रिकेट बोर्डाने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सौराष्ट्रचा 23 वर्षाखालील संघ चंडीगढहून राजकोटला परतत होता. पण चंदीगढ विमानतळावर  (Chandigarh Airport) तपासादरम्यान या खेळाडूंच्या किट बॅगची तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांच्या बॅगेत दारुच्या अेक बाटल्या आढळून आल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना 25 जानेवारीला सीके नायुडू ट्रॉफीदरम्यान (C K Naidu Trophy) घडली. या स्पर्धेत सौराष्ट्र संघाने चंदीगढवर मात केली. त्यानंतर संघाकडून विजयी जल्लोष करण्यात आला. क्रिकेटर्सना ज्या विमानाने प्रवास करायचा होता. त्या विमानाच्या कार्गो परिसरात मोठ्या प्रमाणावर दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. चंदीगढ विमानतळावर ही कारवाई करण्यात आली. ही घटना दुर्भाग्यपूर्ण असल्याचं चंदीगढ विमातळ व्यवस्थापनाने सांगितलं आहे.


घटनेची चौकशी होणार
सौराष्ट्र क्रिकेट बोर्डाने ही घटना गांभीर्याने घेतली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा केली आहे. आरोपात तथ्य आढळल्यास खेळाडूंवर कारवाईक करण्याचे आदेशही देण्यता आले आहेत. गुजरात राज्यात दारुबंदी आहे. पर्यटकांना परमिटनंतरच परवानाधारक दारु दुकानातून दारू विकत घेता येते. 


सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव हिमांशु शाह यांनी क्रिकेट खेळाडूंच्या किट बॅगेत दारुच्या बाटल्या सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याप्रकरणी चौकशी सुरु असून पूर्ण माहिती आल्यानंतर कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं. खेळाडूंनी नियमांचं उल्लंघन केलं असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात येणार असून या समितीच्या अहवालानंतर ज्या खेळाडूंच्या किटबॅगमध्ये दारू सापडली आहे. त्या खेळाडूंवर कठोर कारवाई केली जाईल असे संकेत हिमांशु शाह यांनी दिले आहेत. 


सीके नायडू ट्रॉफी


कर्नल सीके नायडू यांच्या नावावरुन ही स्पर्धा खेळवली जाते. सीके नायडू यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1895 मध्ये एका वकिल कुटुंबात झाला.  1916 मध्ये त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. भारतीय कसोटी संघाचे ते पहिले कर्णधार होते. त्यांच्या सन्मानार्थ भारतीय क्रिकेट बोर्डाने क्रिकेट स्पर्धा केली आणि या स्पर्धेचं नाव सीके नायडू ट्रॉफी ठेवण्यात आलं. या स्पर्धेत 23 वर्षाखालील खेळाडूंचा संघ सहभागी होतो. ही एक स्थानिक क्रिकेट स्पर्धा असून याचं आयोजन बीसीसीआयतर्फे केलं जातं. 2023 मध्ये गुजरात संघाने अंतिम सामन्यात मुंबईचा पराभव करत सीके नायडू ट्रॉफीवर नाव कोरलं.