ऍशेस जिंकायची असेल तर अहंकार घरी ठेवा, विराटचा ऑस्ट्रेलियाला सल्ला
भारताविरुद्धच्या ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा २-१नं पराभव झाला.
सिडनी : भारताविरुद्धच्या ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा २-१नं पराभव झाला. ७१ वर्षात पहिल्यांदाच भारतानं ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत टेस्ट सीरिजमध्ये पराभूत केलं. याचबरोबर भारत हा ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकणारा पहिला आशियाई देश ठरला आहे. सध्या कठीण कालावधीतून जाणाऱ्या ऑस्ट्रेलियापुढे आता ऍशेसचं मोठं आव्हान असणार आहे. भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीनं ऍशेससाठी ऑस्ट्रेलियाला सल्ला दिला आहे. ऍशेस सीरिजमध्ये जिंकायचं असेल तर अहंकारावर अंकुश ठेवा आणि अहंकार घरी ठेवा, असं विराट ऑस्ट्रेलियाला म्हणाला आहे.
तुम्ही अहंकार घेऊन मैदानात उतरलात तर तुम्ही कदाचित तिकडे पोहोचणारच नाही. इंग्लंडमधला ड्यूक्स बॉल तुमचा अहंकार संपवून टाकतो. तुम्हाला स्वत:ला ताब्यात ठेवावं लागतं. दिवसभर कठोर प्रयत्न करावे लागतात. इंग्लंडमध्ये तुम्हाला संयमानं बॅटिंग करावी लागते. टेस्ट क्रिकेटमध्ये बराच वेळ असतो, पण बॅट्समन अनेकवेळा चिंतेत असतात आणि ही गोष्ट त्यांच्या लक्षातच राहत नाही, असं वक्तव्य विराटनं केलं.
लवकर रन काढण्यासाठी प्रत्येक बॅट्समन आग्रही असतो, पण इंग्लंडमध्ये तुम्हाला तसा खेळ करता येत नाही. इंग्लंडमधल्या वातावरणात तुम्हाला वेळ घेऊन खेळावं लागतं, तरच तुम्हाला रन करता येतात. इंग्लंडमध्ये खेळताना बॅट्समननी स्कोअरबोर्डवर आपण किती बॉल खेळलो हे न पाहणंच सोयीस्कर असतं, अशी प्रतिक्रिया विराटनं दिली.
दक्षिण आफ्रिकेमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. ऍशेस सीरिजमध्ये हे दोन्ही खेळाडू पुनरागमन करतील. २००१ सालानंतर ऑस्ट्रेलियाला इंग्लंडमध्ये ऍशेस सीरिज जिंकता आलेली नाही.
२०१४ साली झालेल्या इंग्लंड दौऱ्यामध्ये विराट कोहलीनं निराशाजनक कामगिरी केली होती. त्या दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजमध्ये विराटला फक्त १३.४०च्या सरासरीनं रन करता आल्या होत्या. पण २०१८ सालच्या इंग्लंड दौऱ्यात विराटनं हे सगळं अपयश धुवून काढलं. ५ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये विराटनं रेकॉर्ड ५९३ रन केले होते.