नवी दिल्ली : वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला. टीम इंडीयासोबत करोडो भारतीय क्रिकेटप्रेमींना या पराभवाचा धक्का बसला. पण यातील बरेचजण धक्क्यातून सावरु शकले नाहीत.  बिहार आणि कोलकाता येथे हा धक्का पचवू न शकल्यामुळे दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.  तर पराभवामुळे एकाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरणही समोर आले आहे. ओडीशाच्या कालाहांडी येथे ही घटना घडली. सम्बारु भोई असे त्याचे नाव असून तो सिंघभडी गावात राहतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

25 वर्षाच्या भोईने गुरुवारी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तो आपल्या मित्रांसोबत टीव्हीवर भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट सामना पाहत होता असे पोलिसांनी सांगितले. भारत जिंकणार यावर भोईला विश्वास होता. त्याने आपल्या मिंत्रासोबत यासंदर्भात पैज देखील लावली होती. मॅचच्या निकालानंतर तो नैराश्यात गेला. घरातून निघून त्याने थेट शेत गाठले आणि तिेथे जाऊन विष प्यायला. त्याला धर्मगडच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.



श्वसनाचा त्रास 


बिहारच्या किशनगंज येथे घडली. याठिकाणी भारत-न्यूझीलंड सामना सुरु असताना अशोक पासवान या व्यक्तीला श्वसनाचा त्रास जाणवू लागला. यानंतर अशोक पासवान यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती 'खबर सिमांचल' या फेसबुक पेजच्या वार्ताहराने दिली आहे.


हदयविकाराचा झटका 


कोलकाता येथे श्रीकांता मैती या सायकलचे दुकान चालवणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला. श्रीकांता मैती आपल्या मोबाईल फोनवर भारत-न्यूझीलंडचा सामना पाहत होते. यावेळी महेंद्रसिंग धोनी बाद झाल्यानंतर मैती यांना हदयविकाराचा झटका आला. स्थानिकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच श्रीकांता मैती यांचा मृत्यू झाला होता.