दिल्ली : आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमच्या एका खेळाडूला जबर मारहाण करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी विकास टोकस नावाच्या खेळाडूला मारहाण केली आहे. विकास 2016 मध्ये RCB टीमचा भाग होता. दिल्ली पोलिसांच्या एका जवानाने विकासच्या चेहऱ्यावर मारलं असून त्याचा डोळा फुटण्यापासून वाचलाय. यानंतर विकासने याप्रकरणी दिल्ली पोलीस मुख्यालयात तक्रार दाखल केलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटर विकासने भिकाजी कामा पोलीस स्टेशनचे पोस्ट इन्चार्जच्या विरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीत त्याने म्हटलंय की, पोलीस अधिकाऱ्याने गैरवर्तन केलं आणि मला मारहाण केली.' यामध्ये खेळाडूच्या डोळ्याखाली गंभीर दुखापत झाली असून त्याची दृष्टी अगदी थोडक्यासाठी वाचली आहे.


विकासने दिल्ली पोलीस मुख्यालयाला दिलेल्या तक्रारीत पुढे लिहिलंय की, "माझ्यासोबत 26 जानेवारी 2022 रोजी घडलेल्या प्रकरणाच्या तक्रारीसंदर्भात मी मेल करतोय. मी राष्ट्रीय स्तराचा क्रिकेटर आहे आणि आयपीएलमध्येही खेळतो. 26 जानेवारीला माझ्यासोबत एका पोलीस अधिकार्‍यांनी गैरवर्तन केलं जे निंदनीय आहे.


तो पुढे म्हणाला, "मला एका अधिकार्‍याने तोंडावर मुक्का मारला. ज्यात सुदैवाने माझी दृष्टी गेली नाही. माझी आपणास विनंती आहे की लवकरात लवकर या प्रकरणात लक्ष घालावं. या घटनेपासून अनेक मानसिक समस्यांना सामोरं जावं लागतंय."


विकासचं क्रिकेट करियर


विकासने 15 प्रथम श्रेणी आणि 17 टी-20 सामने खेळलेत. मात्र, या काळात त्याची काही कामगिरी विशेष झाली नाही. विकासला आयपीएलमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. 2016 मध्ये तो बंगळुरू संघाचा भाग होता.