भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीरची (Gautam Gambhir) मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली असून त्याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघामध्ये (Indian Cricket Team) नव्या युगाची सुरुवात होत आहेत. गौतम गंभीर आपला आक्रमक स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. श्रीलंकेविरोधातील कसोटी मालिकेसह गौतम गंभीरच्या कार्यकाळाला सुरुवात होत आहे. राहुल द्रविडचा कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीरची निवड करण्यात आली असून, आता भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतंच भारतीय क्रिकेट संघाचा माजी विकेटकिपर दिनेश कार्तिकने गौतम गंभीरचं कौतुक केलं आहे. 2011 वर्ल्डकप विजेच्या संघाचा भाग असणाऱ्या गौतम गंभीरच्या नेतृत्वात भारतीय संघात अनेक बदल पाहायला मिळतील अशी आशा त्याने व्यक्त केली आहे. 


“तो खूप चांगला लीडर आहे. मला वाटतं की तो भारतीय संघात दोन महत्त्वाच्या गोष्टी आणेल. एक म्हणजे पूर्णपणे प्लेअर मॅन आहे. तो त्याच्या खेळाडूंचं रक्षण करतो, आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ते खूप महत्वाचे आहे. कारण, कधीकधी, जेव्हा कामगिरी तुमच्या मनाप्रमाणे होत नाही तेव्हा तुम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकटेपणा वाटू शकतो. त्यामुळे गंभीर ते काम करेल,” असं दिनेश कार्तिकने Cricbuzz शी बोलताना सांगितलं.


“दुसरं म्हणजे तो या भारतीय संघासाठी निश्चितपणे एक चतुर रणनीति आखण्याचं काम करेल. तो फार आक्रमक असून आहे. मला नेहमी अशा संघासाठी खेळायला आवडतं जो खेळ जिंकण्यासाठी जे काही करावे लागेल ते करतो,” असं तो पुढे म्हणाला.


2011 एकदिवसीय विश्वचषक आणि 2007 टी -20 विश्वचषक व्यतिरिक्त, गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्ससह एक खेळाडू म्हणून दोन आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. नंतर 2024 मध्ये, तो केकेआरमध्ये मार्गदर्शक म्हणून सामील झाला आणि ट्रॉफी जिंकला.


श्रीलंकेविरोधातील मालिकेबद्दल बोलायचं गेल्यास 27 जुलैपासून सुरू होणाऱ्या टी-20 साठी सूर्यकुमार यादवची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर हार्दिक पांड्याकडे नेतृत्व येईल अशी अपेक्षा होती. पण सूर्यकुमारची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. 


टी-20 नंतर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत श्रीलंकेविरोधात तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. विशेष म्हणजे युवा फलंदाज शुभमन गिलला दोन्ही मालिकेसाठी उपकर्णधारपद देण्यात आले आहे.