INDVSAUS: ऍडलेडमध्ये विजय, पण भारत ही चूक कधी सुधारणार?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा ३१ रननी विजय झाला.
ऍडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा ३१ रननी विजय झाला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये पहिल्यांदाच भारतानं पहिली टेस्ट मॅच जिंकण्याचं रेकॉर्ड केलं आहे. या मॅचच्या पहिल्या दिवसाचं पहिलं सत्र सोडलं तर भारताचाच पगडा होता. पण चांगली कामगिरी करूनही भारताला हा विजय मिळवण्यासाठी शेवटी संघर्ष करावा लागला. सुरुवातीच्या विकेट पटापट घेतल्यानंतर भारतीय बॉलरना ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या खेळाडूंची विकेट घेताना घाम गाळावा लागला.
एकीकडे ऑस्ट्रेलियाचे तळाचे खेळाडू असा सामना करत असताना भारताच्या तळाच्या खेळाडूंनी मात्र निराशा केली. या मॅचमध्ये रवीचंद्रन अश्विन (२५ रन आणि ५ रन) वगळता कोणत्याही खालच्या खेळाडूला दोन अंकी रन बनवता आल्या नाहीत. ईशांत शर्मा (४ रन, ० रन), मोहम्मद शमी (६ रन, ० रन) आणि जसप्रीत बुमराह (० रन, ० रन) स्वस्तात आऊट झाले.
सुनील गावसकर यांचा सल्ला
मॅच संपल्यानंतर सुनील गावसकर यांनी भारताच्या तळाच्या बॅट्समनना सल्ला दिला आहे. भारताच्या तळाच्या बॅट्समनची कामगिरी चिंताजनक आहे. भारतीय टीमला शेवटच्या क्रमांकांच्या बॅट्समनच्या विकेटची किंमत कळली पाहिजे. प्रत्येक बॅट्समनला त्याच्या विकेटचं महत्त्व सांगितलं पाहिजे. ऑस्ट्रेलियाचे बॉलर जेव्हा बॅटिंग करायला आले तेव्हा त्यांनी कडवी झुंज दिली, असं गावसकर म्हणाले.
ऍडलेडमधल्या पहिल्या मॅचमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया ६ बॅट्समन, एक विकेट कीपर आणि ४ बॉलर घेऊन मैदानात उतरले. पहिल्या इनिंगमध्ये दोन्ही टीमनी त्यांची सहावी विकेट १२७ रनवर गमावली. पण भारताचा स्कोअर २५० रन तर ऑस्ट्रेलियाचा स्कोअर २३५ रन झाला. दुसऱ्या इनिंगमध्ये मात्र भारताचे शेवटचे ४ बॅट्समन फक्त २५ रन करू शकले. तर ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या ४ बॅट्समननी पुन्हा एकदा शानदार प्रदर्शन केलं. दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या ४ बॅट्समननी १३३ रन केले.
भारतानं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३२३ रनचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा स्कोअर १५६/६ असा होता. तेव्हा भारत अगदी सहज मॅच जिंकेल असं वाटत होतं. पण तळाच्या बॅट्समननी पुन्हा एकदा भारताला त्रास दिला. नॅथन लायननं ३८ रन, पॅट कमिन्सनं २८ रन, मिचेल स्टार्कनं २८ रन आणि जॉस हेजलवूडनं १३ रन केले. ऑस्ट्रेलियाचे तळाचे बॅट्समनच भारताच्या हातातली मॅच घेऊन जातायत असं वाटत असतानाच भारतानं हेजलवूडची विकेट घेत सामना खिशात टाकला.
इंग्लंडमध्येही तिच चूक
इंग्लंड दौऱ्यामध्येही भारतीय बॉलरनी अशाच प्रकारची चूक केली होती. आठव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या सॅम कुरननं २ टेस्ट मॅचमध्ये शानदार बॅटिंग करून भारताच्या विजयाचा घास ओढावून घेतला होता.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा ३१ रननी पराभव झाला होता. त्या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये सॅम कुरननं २४ रन केले होते. दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडची अवस्था ८७-७ अशी होती. पण सॅम कुरननं ६३ रनची खेळी केली आणि इंग्लंडला १८० रनपर्यंत पोहोचवलं. या इनिंगमध्ये कुरननं तळाच्या बॅट्समनना हाताशी धरून झुंजार खेळी करत भारताला नमवलं.
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ६० रननी पराभव झाला. या मॅचमध्येही सॅम कुरनच भारताच्या विजयात अडथळा बनला. चौथ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडची अवस्था ८६-६ अशी होती. पण पुन्हा एकदा सॅम कुरननं ७८ रनची खेळी करून इंग्लंडला २४६ रनपर्यंत पोहोचवलं. दुसऱ्या इनिंगमध्येही सॅम कुरननं ४६ रनची महत्त्वाची खेळी केली होती.
इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारताचा ४-१नं पराभव झाला होता. पण भारताच्या बॉलरनी तळाच्या बॅट्समनना स्वस्तात आऊट केलं असत तर मात्र त्या सीरिजचा निकालही वेगळा लागला असता.