Champions Trophy: पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचा भारताला इशारा, `तुमच्या विराट कोहलीचं करिअर...`
Champions Trophy: चॅम्पिअन्स ट्रॉफी (Champions Trophy) पाकिस्तानात (Pakistan) होणार असल्याने भारत सहभागी होणार की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. बीसीसीआय (BCCI) आणि केंद्र सरकारने अद्याप याबाबत अधिकृतपणे कोणतंही भाष्य केलेलं नाही.
Champions Trophy: चॅम्पिअन्स ट्रॉफी (Champions Trophy) पाकिस्तानात (Pakistan) होणार असल्याने भारताच्या सहभागाबाबत शंका आहे. भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध गेल्या काही वर्षांपासून ताणलेले आहेत. रिपोर्ट्सनुसार, बीसीसीय भारतीय संघाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी देण्याची शक्यता कमीच आहे. दुसरीकडे एकदिवसीय वर्ल्डकपसाठी पाकिस्तान संघ भारतात आला होता, त्यामुळे त्याची परतफेड कऱण्याच्या हेतूने भारतीय संघ पाकिस्ताना जाऊ शकतो असंही बोललं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये भारताचे सर्व सामने खेळवले जाणार आहेत. दरम्यान बीसीसीआयने गतवर्षी आशिया कपदरम्यान ज्याप्रमाणे हायब्रीड मॉडेलनुसार भारताचे सामने आयोजित केले होते तशाच प्रकारे यावेळीही खेळवलं जावं असा प्रस्ताव ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे. आशिया कपमध्ये भारताचे सामने श्रीलंकेत खेळवण्यात आले होते.
चॅम्पिअन्स ट्रॉफीवरुन चर्चा रंगलेली असताना पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार युनिस खान यांनी भारताला आपल्या देशात येण्याची विनंती केली आहे. विराट कोहलीच्या करिअरमध्ये ही एकमेव गोष्ट राहिली आहे असं ते म्हणाले आहेत. "विराट कोहलीने 2025 मधील चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात आलं पाहिजे. ही आमचीही इच्छा आहे. त्याने पाकिस्तानात येऊन चांगली कामगिरी करावी. मला वाटतं विराट कोहलीच्या करिअरमध्ये पाकिस्तानचा दौरा करत चांगली कामगिरी करणं इतकंच बाकी आहे," असं त्यांनी 'न्यूज 24' शी संवाद साधताना सांगितलं.
कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या दोन वर्षांपूर्वी, 2006 मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध शेवटची द्विपक्षीय मालिका खेळली होती. डिसेंबर 2012 मध्ये पाकिस्तान संघ मर्यादित षटकांच्या दौऱ्यासाठी भारत दौऱ्यावर आला तेव्हा विराट कोहलीने मालिका खेळली होती. पण विराट कोहली अद्याप पाकिस्तानविरोधात कसोटी खेळू शकलेला नाही.
अहवालानुसार, पीसीबीने आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास बीसीसीआयला मनवण्याचं काम आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर (ICC) सोडलं आहे. पीसीबीच्या सूत्रानुसार, कोलंबोमध्ये नुकत्याच झालेल्या आयसीसीच्या बैठकीत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बजेटला मंजुरी देण्यात आली होते. परंतु वेळापत्रक आणि स्वरूप यावर चर्चा झालेली नहाी.
"पीसीबीने आता चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमान म्हणून जे आवश्यक होते ते केले आहे. त्यांनी कार्यक्रमाचे प्रारूप आणि फॉरमॅट सादर केलं आहे. कार्यक्रमाचं बजेटही सादर केले आहे," असे पीसीबीच्या सूत्राने सांगितले. "आता ते चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक किती लवकर प्रसारित करायचं, त्याला अंतिम रूप द्यायचं हे आयसीसीवर अवलंबून आहे. पीसीबीने ड्राफ्ट शेड्यूलमध्ये सेमीफायनलसह, फायनल (भारत पात्र झाल्यास) भारताचे सर्व सामने लाहोरमध्ये आयोजित करण्याचे सुचवले आहे," असंही त्यांनी सांगितलं आहे.