नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या टी-२० सीरिजला ३ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. पण दिल्लीतल्या प्रदुषणाचा स्तर वाढल्यामुळे मॅचवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. जोपर्यंत दिल्लीतलं प्रदूषण कमी होत नाही, तोपर्यंत क्रिकेटच काय पण कोणताही खेळ दिल्लीत खेळवला जाऊ नये, अशी मागणी माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीरने केली आहे. दिल्लीच्या जनेतपेक्षा कोणताही खेळ मोठा नाही, असं वक्तव्य गंभीरने केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौतम गंभीरने ही मागणी केली असली तरी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली मात्र मॅच खेळवण्यावर ठाम आहे. दिल्लीमध्ये सामना खेळवला जाईल, अशी प्रतिक्रिया गांगुलीने दिली आहे. प्रदुषणामुळे मॅच दुसऱ्या ठिकाणी खेळवण्यात यावी, अशी मागणी अनेकांनी केली होती. 


त्याआधी दिल्लीच्या मैदानावर सराव करत असताना बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी तोंडाला मास्क लावलं होतं. दिल्लीमध्ये मॅच खेळवण्याबाबत बीसीसीआयने आधीच दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीची परवानगी घेतली होती. समितीच्या सल्ल्यानंतर बीसीसीआयने दिल्लीमध्येच मॅच खेळवण्याचा निर्णय घेतला.


भारत दौऱ्यामध्ये बांगलादेश ३ टी-२० आणि २ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. यात ३ नोव्हेंबरला पहिली टी-२० दिल्लीमध्ये, ७ नोव्हेंबरला दुसरी टी-२० राजकोटमध्ये आणि १० नोव्हेंबरला तिसरी टी-२० नागपूरमध्ये होणार आहे. यानंतर १४ नोव्हेंबरपासून पहिली टेस्ट मॅचमध्ये इंदूरमध्ये आणि २२ नोव्हेंबरपासून दुसरी टेस्ट मॅच कोलकात्यामध्ये खेळवली जाईल. कोलकात्यामध्ये होणारी टेस्ट मॅच ही डे-नाईट टेस्ट मॅच असणार आहे. भारत पहिल्यांदाच डे-नाईट टेस्ट मॅच खेळणार आहे.