Gautam Gambhir on Virat Rohit: गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारतीय संघाचा प्रशिक्षक झाल्यानंतर आता भारतीय संघाचं भविष्य काय असेल याची चर्चा सुरु आहे. तसंच विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) 2027 चा वर्ल्डकप खेळणार की नाही याबाबतही शंका व्यक्त होत आहे. त्यातच आता गौतम गंभीरने पत्रकार परिषदेत विराट कोहली आणि रोहित शर्माची इच्छा असेल तर 2027 वर्ल्डकपपर्यंत खेळू शकतात असं स्पष्ट केलं आहे. पण अंतिम निर्णय दोघांनाच घ्यायचा आहे असंही त्याने स्पष्ट केलं. 37 वर्षीय रोहित शर्मा आणि 35 वर्षीय विराट कोहली यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल द्रविडनंतर प्रशिक्षकपद स्विकारणाऱ्या गौतम गंभीरची पहिली पत्रकार परिषद आज पार पडली. यावेळी गौतम गंभीरने रोहित शर्मा आणि विराट कोहली संघाला अनुभव आणि कौशल्य देतात असं म्हटलं. त्यांनी एकदिवसीय आणि टी-20 वर्ल्डकपमध्ये केलेल्या कामगिरीचा उल्लेख केला. 


"मोठ्या स्पर्धांमध्ये आपण काय करु शकतो हे त्यांनी दाखवून दिलं आहे. मग तो टी-20 विश्वचषक असो की एकदिवस विश्वचषक असो. मला वाटतं दोघांमध्ये अजून बरंच क्रिकेट शिल्लक आहे," असं गंभीर म्हणाला. पुढे त्याने सांगितलं की, "त्यांच्यात अजून बरंच क्रिकेट शिल्लक आहे हे स्पष्ट आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून त्यांना प्रेरणा मिळेल अशी आशा आहे".


"2027 विश्वचषकापर्यंत त्यांचा फिटनेस कामय राहील अशी आशा आहे. पण हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यांच्यात किती क्रिकेट शिल्लक आहे, याचं उत्तर देणं कठीण आहे. संघाच्या यशात किती योगदान देऊ शकतो याचा निर्णय अखेऱ खेळाडूंनाच घ्यावा लागतो,” असं गंभीर म्हणाला. 


गौतम गंभीरने यावेळी प्रत्येक खेळाडूच्या वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघाची कामगिरी किती महत्वाची असते याकडे लक्ष वेधलं. तसंच विराट कोहली आमि रोहित शर्मा संघात असणं किती महत्त्वाचं आहे हेदेखील सांगितलं. "अखेर संघ जास्त महत्त्वाचा आहे. पण विराट आणि रोहित काय करु शकतात याचा विचार करता त्यांच्यात अद्याप बरंच क्रिकेट शिल्लक आहे. ते जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत आणि कोणत्याही संघाला ते दोन्ही खेळाडू हवेसे वाटतील," असं गंभीरने सांगितलं.


श्रीलंका दौऱ्यातून गौतम गंभीरचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ सुरु झाला आहे. भारत श्रीलंकेविरोधात तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय मालिका खेळणार आहे.