GT vs MI : शुभमन गिलची गोड सुरूवात, हार्दिक पांड्या फेल; मुंबई इंडियन्सकडून 11 वर्षांची परंपरा कायम!
IPL 2024, GT vs MI : गुजरात टायटन्सने दिलेलं 169 धावांचं लक्ष्य मुंबईसमोर किरकोळ वाटत होतं. मात्र, गुजरातने मुंबई इंडियन्सच्या पारड्यातला विजय खेचून आणला. अशाप्रकारे शुभमन गिलने (Shubhman Gill) कॅप्टन्सीच्या करियरची गोड सुरूवात केली आहे.
Gujarat Titans vs Mumbai Indians : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात जायन्ट्स आणि मुंबई इंडियन्स (GT vs MI) यांच्यात आयपीएलचा पाचवा सामना खेळवला गेला. अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्यात गुजरातने मुंबई इंडियन्सला पाणी पाजलं आहे. त्यामुळे आता गेल्या 11 वर्षांची पराभवाची परंपरा कायम राखली आहे. मुंबईने 2013 नंतर एकदाही पहिला आयपीएलचा सामना जिंकला नाही. गुजरातने 169 धावांचं आव्हान पलटणला दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना अखेरच्या ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सला 19 धावांची गरज होती. 20 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) सिक्स अन् दुसऱ्या बॉलवर फोर मारला, पण तिसऱ्या बॉलवर पांड्या आऊट झाला. त्यानंतर चौथ्या बॉलवर पियुष चावला बाद झाल्यावर मुंबई ढेपाळली. उमेश यादवने (Umesh Yadav) भेदक गोलंदाजी करत गुजरातच्या पाड्यात सामना फिरवला अन् युवा कॅप्टनच्या (Shubhman Gill) नेतृत्वाखाली गुजरातने पहिला सामना 6 धावांनी जिंकला आहे.
गुजरात टायटन्सने दिलेलं 169 धावांचं लक्ष्य मुंबईसमोर किरकोळ वाटत होतं. मात्र, मुंबईचा सलामीवीर इशान किशन शुन्यावर बाद झाल्याने रोहित शर्माच्या खांद्यावर जबाबदारी आली. रोहितने आपलं काम चोखपणे पार पाडलं. रोहित शर्माने 29 बॉलमध्ये 43 धावांची आक्रमक खेळी केली. रोहित आणि ब्रेविसने टीमला सांभाळलं पण रोहित बाद झाल्यावर गुजरातने सामन्यात एन्ट्री घेतली. तिलक वर्माने अखेरच्या ओव्हरमध्ये सामना फिरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्पेन्सर जॉन्सनने तिलकला तंबूत पाठवलं. त्यानंतर मुंबईचा नवा फिनिशर हार्दिक पांड्याने एक सिक्स अन् एक फोर मारला खरा पण त्याला संघाला विजयाच्या उंभरठ्यावर पोहोचवता आलं नाही. अखेर मुंबईने 6 धावांनी सामना गमावला.
प्रथम फलंदाजी करताना गुजरातला चांगली सुरूवात मिळाली. गुजरातच्या सलामीवीरांनी कॅप्टन हार्दिक पांड्याला पहिल्या दोन ओव्हरमध्येच चोप दिला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याने 20 धावा दिल्या. मात्र, बुमराह आला अन् मुंबईला पहिली विकेट मिळाली. बुमराहने वृद्धीमान साहाला तंबूत पाठवलं. त्यानंतर साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी पावरप्लेचा पूर्ण फायदा घेतला. साई सुदर्शनने 45 धावांची खेळी केली, तर कॅप्टन शुभमन गिलने 31 धावा कुटल्या. त्यानंतर कालांतराने विकेट्स पडत गेल्या. राहुल तेवतियाने अखेरीस 22 धावा करत गुजरात टायटन्सला 168 धावांवर पोहोचवलं.
आशिष नेहराची स्मार्ट खेळी
गुजरातचे कोच आशिष नेहराने मैदानाबाहेरून सुत्र हलवली. राशिद खानच्या 4 ओव्हर संपल्यानंतर आशिष नेहराने मोहित शर्माला ओव्हर देण्यास सांगितलं. मोहित शर्माने केवळ 9 रन दिले अन् मुंबईच्या अडचणी वाढवल्या. त्यानंतर आशिष नेहराने स्पेन्सर जॉन्सन याची एक ओव्हर पूर्ण करून घेतली. पहिल्या बॉलवर सिक्स बसल्यानंतर देखील जॉन्सनने पुढचे पाच बॉल टप्प्यात टाकले अन् तिलक वर्मा आणि जेराल्ड कोएत्झीला बाहेर पाठवलं. त्यामुळे आता मुंबईचा भार पांड्यावर आला होता. अखेरच्या ओव्हरमध्ये उमेश यादवने पांड्याचा गेम केला अन् आशिष नेहरा यांनी रितसरपणे मैदानाच्या बाहेरून पलटणचा गेम केला.
हार्दिक पांड्या प्रेक्षकांकडून ट्रोल
टॉसपासून ते सामन्यादरम्यान अनेकदा मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन हार्दिक पांड्या ट्रोल झाल्याचं दिसून आलं. हार्दिक गुजरात टायटन्सला टाटा गुड बाय केल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आला होता. अशातच आजी माजी टीमसोबत खेळताना पांड्या चांगलाच ट्रोल झालाय. प्रेक्षकांनी पांड्याचा डिवचल्याचं दिसून आलं.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, नमन धीर, हार्दिक पांड्या (C), टिम डेव्हिड, शम्स मुलानी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, ल्यूक वुड.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (C), रिद्धिमान साहा, साई सुधारसन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, रविश्रीनिवासन साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन.