Happy Birthday Dravid: `पहिल्या 15 मिनिटांत विकेट घ्या नाहीतर...`; असा होता `द वॉल`चा दरारा
सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, एमएस धोनी आणि विराट कोहलीप्रमाणे राहुल कधीच भारतीय क्रिकेटचा पोस्टर बॉय झाला नाही. आपल्या शांत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या द्रविडने कायमच पडद्यामागे राहून काम करण्यास प्राधान्य दिलं.
जॅम जॅम जॅमी... असं म्हटल्यानंतर जाहिरातीबरोबरच डोळ्यासमोर येणारा चेहरा म्हणजे भारतीय संघात 'द वॉल' नावाने ओळखला जणारा राहुल द्रविड! भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी असलेल्या राहुल द्रविडने आज वयाचं अर्धशतक गाठलं. आज म्हणजेच 11 जानेवारी 2023 रोजी द्रविड आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. इंदूरमध्ये जन्मलेल्या द्रविडचे वडील हे वैज्ञानिक होते तर त्याची आई जॅम आणि केचअप बनवायची. त्यामुळेच द्रविडला संघातील सहकाऱ्यांनी जॅमी असं टोपण नाव ठेवलं होतं.
...म्हणून पडलेलं 'द वॉल' हे नाव
सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, एमएस धोनी आणि विराट कोहलीप्रमाणे राहुल कधीच भारतीय क्रिकेटचा पोस्टर बॉय झाला नाही. आपल्या शांत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या द्रविडने कायमच पडद्यामागे राहून काम करण्यास प्राधान्य दिलं. द्रविड शांत स्वभावासाठी ओळखला जात होता तरी त्याचा0 जगभरातील सर्वच गोलंदाजांमध्ये आदरयुक्त दरारा होता. ऑस्ट्रेलियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला स्टीव वॉ भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान अनेकदा आपल्या सहकाऱ्यांना द्रविडबद्दल एक सल्ला द्यायचा. "पहिल्या 15 मिनिटांमध्ये त्याची विकेट घ्यायला हवी. तसं नाही झालं तर इतर 10 खेळाडूंना बाद करण्याचा प्रयत्न करा," असं वॉ त्याच्या संघ सहकाऱ्यांना सांगायचा. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही, "द्रविडला गोलंदाजी करणं हे सचिनला गोंलंदाजी करण्यापेक्षा अधिक कठीण होतं," असं म्हटलेलं. खरोखरच द्रविडची फलंदाजी आणि त्यातही त्याची बचावात्मक शैली एवढी सशक्त होती की त्याची विकेट घेताना गोलंदाजांचं घामटं निघायचं. त्याचा बचाव भेदणं जवळजवळ अशक्य होतं. त्यामुळेच त्याला 'द वॉल' हे नाव पडलं.
नशिबाने मिळाली पहिली कसोटी खेळण्याची संधी
द्रविडने वयाच्या 17 व्या वर्षापासून कर्नाटककडून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. राहुलला आपली कसोटी खेळण्याची संधीसुद्धा अगदी नशिबाने मिळाली. 1996 साली इंग्लंडच्या दौऱ्यावर असताना संजय मांजरेकर जखमी झाले. त्यामुळे त्यांच्या जागी द्रविडला संघात संधी देण्यात आली. याच सामन्यामध्ये गांगुलीनेही पदार्पण केलं. पदार्पणामध्येच गांगुलीने शतक झळकावलं तर द्रविड 95 धावा करुन तंबूत परतला. अर्थात गांगुलीने शतक झळकावल्याने द्रविडपेक्षा त्याचीच अधिक चर्चा झाली.
हेसुद्धा वाचा >> IND vs SL Virat Kohli Century: विराट कोहलीच्या ७३ व्या शतकानंतर अनुष्का शर्माची खास Insta स्टोरी
कधीच गोल्डन डकवर झाला नाही बाद
द्रविडने 16 वर्षांच्या आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये एकूण 31 हजार 258 चेंडूंचा सामना केला. तो एकूण 736 तास फलंदाजी करत होता. द्रविड त्याच्या कारकिर्दीमध्ये कधीच गोल्डन डक म्हणजेच पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला नाही. त्याने 164 कसोटी सामन्यांमध्ये स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना 210 झेल घेतले. हा एक अनोखा विक्रम आहे. द्रविडने आपला एकमेव आंतरराष्ट्रीय टी-20 सामना 2011 साली खेळला. यामध्ये त्याने 31 धावा केल्या.
चार डावांमध्ये चार शतकं
द्रविडने 509 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 24 हजार 208 धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकरनंतर द्रविड हा भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज आहे. भारताच्या या माजी कर्णधाराने कसोटी क्रिकेटमध्ये 36 शतकं झळकावली आहेत. राहुलच्या नावावर कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या सर्वच्या सर्व दहा संघांविरोधात शतकं झळकावल्याचा विक्रम आहे. द्रविड हा असा एकमेव खेळाडू आहे ज्याने चार डावांमध्ये चार शतकं झळकावली आहेत. द्रविडने नागपूरच्या विजेता पेंढारकरबरोबर लग्न केलं. विजेता या पेशाने डॉक्टर आहेत.