IPL 2024: मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) आयपीएलमधील खराब कामगिरी अद्यापही सुरु आहे. एकीकडे प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी संघांमध्ये चुरस सुरु असताना मुंबई आता या स्पर्धेतून बाहेर पडण जवळपास निश्चित झालं आहे. शनिवारी दिल्लीविरोधातील (Delhi Capitals) सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढली. मुंबई इंडियन्सने 10 धावांनी हा सामना गमावला. दरम्यान कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) सर्वाधिक धावा करणाऱ्या तिलक वर्माला (Tilak Varma) पराभवासाठी जबाबदार धरलं आहे. त्याच्यात सामन्याबद्दल जागरुकतेची कमतरता असल्याने पराभव झाला असं सांगत हार्दिक पांड्याने त्याच्यावर पराभवाचं खापर फोडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 257 धावांचा डोंगर उभा केला होता. जेकने स्फोटक सुरुवात करत 48 चेंडूत तब्बल 84 धावा ठोकल्या. त्याला होपची साथ मिळाली. त्याने 41 धााव कुटल्या. मुंबईच्या एकाही गोलंदाजाला दिल्लीने सोडलं नाही. हार्दिक पांड्यालाही दिल्लीच्या फलंदाजांनी 2 ओव्हरमध्ये 41 धावा ठोकल्या. 


दरम्यान फलंदाजी करताना हार्दिकने 46 धावा ठोकत जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. तिलक वर्माने केलेल्या 63 धावांनंतर हार्दिक पांड्या दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. तिलक वर्मा शेवटी ऐन मोक्याच्या क्षणी धावबाद झाला. 


हार्दिकने तिलकवर फोडलं पराभवाचं खापर


तिलक वर्माने ज्याप्रकारे एका बाजूला भक्कमपणे उभं राहताना स्थिती सांभाळली त्यावर हार्दिक पांड्या नाराज झाला. "जेव्हा अक्षर पटेल गोलंदाजी करत होता तेव्हा त्याच्यावर तुटून पडणे हा सर्वोत्तम पर्याय होता," असं हार्दिकने सामना संपल्यानंतर सांगितलं. पुढे तो म्हणाला की, "मला वाटतं की सामन्याबद्दल जी जागरुकता हवी होती ती थोडीशी कमी पडली. दिवसाच्या अखेर आम्हाला याची मोठी किंमत मोजावी लागली आणि सामना गमावला".


हार्दिक सामन्यातील ज्या क्षणाबद्दल बोलत होता, त्यावेळी डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर आठव्या षटकात गोलंदाजी करत होता. त्यावेळी मुंबईची 3 बाद 72 अशी अवस्था होती. अक्षरने सामन्यात फक्त दोन षटके टाकली. त्याने टाकलेल्या 12 चेंडूंपैकी तिलकने 6 चेंडूंचा सामना केला. पण त्याने पहिल्या चार चेंडूंवर फक्त एक धाव घेणं निवडलं.


त्यानंतर तिलकने षटकार आणि चौकार मारून मुंबईला 10 षटकांत 3 बाद 115 अशी मजल मारली. त्यानंतर अक्षरला पुन्हा गोलंदाजी देण्यात आली नाही. दरम्यान, तिलकने शेवटच्या षटकापर्यंत फलंदाजी केली, अंतिम षटकाच्या पहिल्या चेंडूवर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करताना तो धावबाद झाला.


हार्दिकने म्हटलं आहे की, "सध्या ज्याप्रकारे खेळ खेळला जात आहे, ते पाहता सर्व गोलंदाज दबावात आहेत. आम्ही आत्मविश्वासात थोडे कमी पडलो. पण जर मला चूक दाखवायची असेल तर मधल्या काही ओव्हर्समध्ये आम्ही थोडी जोखीम उचलायला हवी होती". हार्दिक पांड्याने यावेळी 27 चेंडूत 84 धावा ठोकणाऱ्या दिल्लीच्या जेकचं कौतुक केलं. सध्याची तरुणाई निर्भीड असल्याचं त्याने दाखवून दिलं असं हार्दिकने सांगितलं आहे.