BCCI ची `गंभीर` भूमिका! विराटला साधं विचारलंही नाही; हार्दिकचा आवर्जून घेतला सल्ला
BCCI Big Call On Head Coach: भारताचा माजी कर्णधार राहिलेल्या विराट कोहलीला टी-20 वर्ल्ड कपमध्ये शेवटचा सामना वगळता नावाचा साजेशी कामगिरी करता आली नाही. विराटने अंतिम सामन्यात उत्तम फलंदाजी केली.
BCCI Big Call On Head Coach: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा स्फोटक फलंदाज विराट कोहलीसंदर्भातील एक बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने गौतम गंभीरला भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करताना कोहलीशी सल्लामसलत केली नाही, अशी माहिती समोर येत आहे. विराटचं गंभीरच्या नियुक्तीसंदर्भात काही म्हणणं आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न बीसीसीआयने केलेला नाही. भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ टी-20 वर्ल्ड कप 2024 चा अंतिम सामना झाला त्या दिवशी म्हणजेच 29 जून रोजी संपुष्टात आल्यानंतर गंभीर भारताच्या प्रशिक्षक पदी नियुक्त झाला आहे. असं असतानाच आता कोहलीला न कळवता किंवा त्याच्याशी न बोलताना गंभीरची नियुक्ती बीसीसीआयने केल्याची माहिती समोर येत आहे. विराट आणि गंभीर यांच्यामधील नातं फारसं चांगलं नसून दोघांचे अनेकदा मैदानावर खटके उडल्याचं पाहायला मिळालं आहे. दोघांनी 2024 च्या आयपीएलदरम्यान मैदानात एकमेकांना मिठी मारल्याचं पाहायला मिळालं असलं तरी पूर्वी त्यांच्यात झालेले वाद हे अधिक मोठे होते. गंभीरच्या नियुक्तीमध्ये विराटचं म्हणणं बीसीसीआय ऐकून घेईल किंवा विराटच्या म्हणण्याला वजन असेल असं गंभीरच्या नियुक्तीपूर्वी मानलं जात होतं. मात्र याच्या पूर्णपणे उलट चित्र पाहायला मिळालं आहे.
गंभीरबरोबर 5 वर्षांचा करार; विराटला न कळवण्याचं कारण काय?
गौतम गंभीरबरोबर बीसीसीआयने प्रमुख प्रशिक्षक म्हणून 5 वर्षांचं करार केला आहे. या कालावधीमध्ये आयसीसीच्या पाच स्पर्धा होणार आहे. ज्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025, टी-20 वर्ल्ड कप 2026, एकदिवसीय वर्ल्ड कप 2027 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या स्पर्धांचा समावेश आहे. विराट कोहलीने टी-20 वर्ल्ड कप 2024 जिंकल्यानंतर टी-20 अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तर विराट 2027 च्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. भविष्याचा विचार करुन बीसीसीआयने गंभीरची नियुक्ती करताना म्हणूनच विराटचा सल्ला घेतला नाही अशी शक्यता व्यक्त केली जात असल्याचं 'हिंदुस्तान टाइम्स'नं बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
विस्तृत स्वरुपात याकडे पाहणं गरजेचं
"दोघांना समोरासमोर बसून बोलताना येईल इतका वेळ त्यांच्याकडे आहे. मात्र भविष्यामध्ये अनेक तरुण चेहरे भारतीय संघाकडून खेळणार असल्याने अधिक विस्तृत स्वरुपात या नियुक्तीकडे पाहणं बीसीसीआयला गरजेचं होतं," असं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं आहे.
पंड्या उपकर्णधार आणि दमदार कामगिरी
बीसीसीआयने गंभीरला भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यापूर्वी ज्या काही मोजक्या खेळाडूंचा सल्ला घेतला त्यामध्ये हार्दिक पंड्याचा समावेश होता असंही 'हिंदुस्तान टाइम्स'च्या वृत्तात म्हटलं आहे. हार्दिक पंड्या भारताच्या टी-20 संघाचा संभाव्य कर्णधार असेल असं मानलं जात आहे. रोहित शर्मा उफलब्ध नसताना त्याने 2022 आणि 2023 मध्ये भारतीय संघाचं टी-20 मध्ये नेतृत्व केलं आहे. मात्र जायबंदी झाल्याने तो टी-20 मधून बाहेर पडला. रोहित शर्मा कर्णधार म्हणून परतल्यानंतर हार्दिकने टी-20 मध्ये उपकर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडली. टी-20 वर्ल्ड कपमध्येही तो उपकर्णधार होता. टी-20 वर्ल्ड कप आधी त्याचा चांगली कामगिरी करता आली नव्हती. मात्र त्याने टी-20 वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करत आपल्या कामगिरीची छाप पाडली. टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये पंड्याने 144 धावा आणि 11 विकेट्स घेत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली.