`त्यांनी माझी कॉलर पकडली आणि...`; विरेंद्र सेहवागचा Coach बद्दल धक्कादायक खुलासा
How Can A Gora Hit Me? संतापलेला हा खेळाडू थेट संघ व्यवस्थापकांच्या खोलीत गेला आणि त्याने, `हा गोरा मला असं कसं मारु शकतो?` असा प्रश्न संतापून विचारला होता. नंतर हे प्रकरण थेट कर्णधाराकडे गेलं आणि त्यानंतर या प्रशिक्षकाने खेळाडूच्या रुममध्ये येऊन त्याची माफी मागितली होती.
Virender Sehwag On John Wright: भारतीय क्रिकेट संघाच्या यशामध्ये न्यूझीलंडचे माजी दिग्गज खेळाडू जॉन राईट यांचेही मोलाचे योगदान आहे. भारतीय संघाच्या संघर्षाच्या काळामध्ये जॉन राईट यांच्या प्रशिक्षणामध्ये चांगली कामगिरी केली. सौरभ गांगुलीसारख्या अनुभवी आणि आक्रमक कर्णधाराबरोबर संघाला सावरताना आणि भारतीय क्रिकेटला नवीन ओळख मिळवून देण्यात जॉन राईट यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जॉन राईट हे भारतीय संघाचे पहिले परदेशी प्रशिक्षक होते. त्यांनी 2000 ते 2005 दरम्यान भारतीय प्रशिक्षक पदाची जबाबदारी पार पाडली.
जॉन राईट यांच्या यशाबरोबरच वादही
आपल्या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये जॉन राईट यांनी भारतीय संघाला अनेक महत्त्वाचे विजय मिळवून देण्यात मोलायचं योगदान दिलं. यामध्ये 2001 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धची कोलकाता कसोटी आणि इंग्लंडमधील नेटवेस्ट ट्रॉफीसारख्या सामन्यांचा समावेश आहे. भारतीय संघ जॉन राईट प्रशिक्षक असतानाच 2003 च्या वर्ल्डकप स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात पोहोचला होता. मात्र एकीकडे मैदानावर दमदार कामगिरी करणाऱ्या संघाचा प्रशिक्षक अशी ओळख निर्माण करतानाच जॉन राईट यांच्यासंदर्भात अनेक वादही निर्माण झाले. एकदा तर जॉन राईट आणि भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागमध्ये धक्काबुक्कीही झाली होती. यासंदर्भात स्वत: सेहवागनेच खुलासा केला होता.
माझी कॉलर पकडली
काँग्रेसचे नेते शशि थरुर यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये सेहवागने स्वत:च्या क्रिकेट करियरमधील हा किस्सा सांगितला होता. दिल्लीतील या कार्यक्रमामध्ये सेहवागने हा 2004 साली इंग्लंड दौऱ्यादरम्यान घडलेला किस्सा सांगितलेला. त्यावेळेस जॉन राईट भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. "प्रशिक्षकांबरोबर धक्काबुक्की झाली होती. नेटवेस्ट सीरीजदरम्यान जॉन राइट यांनी माझी कॉलर पकडली होती आणि मला धक्का दिलेला," असं सेहवाग म्हणाला होता.
रुममध्ये आले आणि माफी मागितली
"त्यावेळेस मी राजीव शुक्लांकडे (तत्कालीन संघ व्यवस्थापक) यांच्याकडे गेलो आणि त्यांना विचारलं होतं की तो गोरा मला असं मारु शकतो? त्यांनी ही गोष्ट कर्णधार सौरव गांगुलीला सांगितली. जोपर्यंत जॉन राईट माफी मागत नाही तोपर्यंत मी कोणतीही सामंजस्याची भूमिका घेणार नाही. त्यानंतर ते माझ्या खोलीत आले आणि त्यांनी माफी मागितली होती," असंही सेहवागने सांगितलं होतं. "त्यानंतर सचिनने एकदा, सेहवाग-जॉन राईट प्रकरण आपल्याला इतिहासजमा करायला हवे. हे आपण उघड करायला नको असं सचिन म्हणालेला. त्यानंतर या प्रकरणाची चर्चा झाली नाही," असं सेहवागने स्पष्ट केलं होतं.