एक ट्विट करुन विराट कमवतो एवढे पैसे, रोनाल्डो टॉपवर
क्रिकेटच्या मैदानाबाहेरही विराटचं रेकॉर्ड
मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा दारुण पराभव झाला आहे. हा पराभव विसरुन आता पुढच्या टेस्ट मॅचसाठी तयारी करण्याचं आव्हान विराट कोहलीच्या टीमपुढे आहे. त्यातच आता अमेरिकेच्या सोशल मीडिया मार्केटिंग फर्म ओपनडोर्सने दिलेल्या रिपोर्टनुसार विराट कोहली एका ट्विटसाठी सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगातल्या खेळाडूंच्या यादीत टॉप-५ मध्ये आहे.
या यादीमध्ये पोर्तुगालचा फूटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो पहिल्या क्रमांकावर आहे. एका ट्विटसाठी रोनाल्डो ८,६८,६०४ डॉलर म्हणजेच ६.२४ कोटी रुपये घेतो. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर स्पेनच्या बार्सिलोनाचा फूटबॉलपटू एंड्रेस इनिएस्ता आहे. इनिएस्ता एका ट्विटसाठी ५,९०,८२५ डॉलर म्हणजेच ४.२५ कोटी रुपये कमावतो.
पाचव्या क्रमांकावर भारताचा कर्णधार विराट कोहलीचं नाव आहे. विराट एका ट्विटसाठी ३,५०,१०१ डॉलर म्हणजे २.५१ कोटी रुपये घेतो. विराट या यादीमधला पहिला क्रिकेटपटू आहे. विराटने काहीच दिवसांपूर्वी इंन्स्टाग्रामवर ५ कोटी फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे.
तिसऱ्या क्रमांकावर ब्राझीलचा फूटबॉलपटू नेमार आहे. नेमार एका ट्विटसाठी ४,७८,१३८ डॉलर (३.४४ कोटी रुपये) कमावतो. यानंतर चौथ्या क्रमांकावर अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू लेब्रोन जेम्स आहे. जेम्स एका ट्विटचे ४,७०,३५६ डॉलर (३.३८ कोटी रुपये) घेतो.