कराची : न्यूझीलंडमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये बांग्लादेशचे क्रिकेटपटू थोडक्यात बचावले. यानंतर बांग्लादेशच्या टीमने न्यूझीलंडचा दौरा अर्धवट सोडला. या हल्ल्यानंतर २०१९ साली इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. पण आयसीसीने मात्र इंग्लंडमध्ये होणाऱ्या या वर्ल्ड कपच्या सुरक्षेबाबत आश्वस्त केलं आहे. वर्ल्ड कपमध्ये सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जाईल, असं आयसीसीकडून सांगण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडच्या क्राईस्टचर्चमधल्या दोन मशिदींमध्ये शुक्रवारी गोळीबार करण्यात आला. यामध्ये ५० जणांचा मृत्यू झाला. बांग्लादेशची टीम या मशिदीच्या जवळच होती. बांग्लादेशची टीम या हल्ल्यातून थोडक्यात वाचली. अखेर या हल्ल्यानंतर बांग्लादेशची टीम माघारी परतली.


कराचीमध्ये पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) फायनलनंतर आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डेव्हिड रिचर्डसन म्हणाले, 'वर्ल्ड कपमध्ये सुरक्षा ही प्राथमिकता असेल. सुरक्षेच्या मुद्द्यामध्ये काहीही नवीन नाही. न्यूझीलंडमध्ये जे झालं, त्यानंतर अनेकांना धक्का बसला. पण वर्ल्ड कपच्या सुरक्षेबाबत सावध राहण्याची गरज आहे. आयसीसीचे सुरक्षा अधिकारी ब्रिटनमधल्या सगळ्या सुरक्षा यंत्रणांसोबत काम करत आहेत. सुरक्षेच्या त्यांच्या उपाययोजना पूर्ण झाल्या आहेत. सुरक्षेमध्ये कोणतीही कमी राहणार नाही.'


इंग्लंडमध्ये ३० मेपासून वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. ३० मे १४ जुलैदरम्यान वर्ल्ड कप खेळवण्यात येणार आहे. याआधी भारतानेही पाकिस्तानविरुद्धच्या मॅचसाठीच्या सुरक्षेबाबत आयसीसीच्या बैठकीत चिंता व्यक्त केली होती. १६ जूनला भारत आणि पाकिस्तानची मॅच नियोजित आहे.


पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४४ पेक्षा जास्त जवान शहीद झाले. यानंतर भारत आणि पाकिस्तानमधले संबंध ताणले गेले. एवढच नाही तर भारताने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, अशी मागणीही जोर धरू लागली. भारताच्या काही माजी क्रिकेटपटूंनीही या मागणीचं समर्थन केलं. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीनेही आयसीसीला पत्र लिहिलं. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांशी संबंध तोडण्यात यावेत, अशी मागणी बीसीसीआयने या पत्रात केली होती. पण बीसीसीआयने या पत्रात पाकिस्तानचं थेट नाव घेणं टाळलं होतं. आयसीसीने मात्र अशाप्रकारे कोणत्या देशावर कारवाई करण्यात येणार नाही, असं म्हणत बीसीसीआयची मागणी फेटाळून लावली.