आव्हान दिल्यामुळे प्रत्युत्तर दिलं, शोएब अख्तरची टीवटीव
मंगळवारी भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानमधल्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले.
मुंबई : मंगळवारी भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानमधल्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले. यानंतर बावचळलेल्या पाकिस्ताननं बुधवारी सकाळी जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय हवाई सीमेत त्यांची ३ विमानं पाठवली. यातल्या एका एफ-१६ या विमानाला भारतीय वायुसेनेनं लाम सेक्टरमध्ये पाडलं. तर पाकिस्ताननं केलेल्या दाव्यानुसार त्यांनी भारतीय वायुसेनेच्या दोन विमानांना लक्ष्य केलं. एवढच नाही तर एक भारतीय वैमानिकही आमच्या ताब्यात असल्याची माहिती पाकिस्तान सैन्यदलाचे प्रवक्ते मेजर जनलर आसिफ गफूर यांनी दिली.
रेडियो पाकिस्ताननं एक व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर शेअर केला आहे. या व्हिडिओतील व्यक्ती भारतीय वैमानिक अभिनंदन वर्थमान असल्याचं सांगण्यात येतंय. या व्यक्तीला त्याची ओळख विचारल्यानंतर आपला सर्व्हिस क्रमांक २७९८१ असल्याचं त्यानं सांगितलेलं या व्हिडिओत दिसतंय. आपण भारतीय वैमानिक असून आपला धर्म हिंदू असल्याचंही त्यानं म्हटलंय.
शोएब अख्तरची टीवटीव
दरम्यान पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर यानं ट्विटरवर गरळ ओकली आहे. 'आमचे पंतप्रधान इम्रान खान आणि लष्करानं मागच्या काही दिवसांपासून आम्हाला युद्ध नकोय हे सांगितलं होतं. पण जर आमच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिलं जात असेल, तर योग्य प्रतिसाद देण साहजिकच आहे,' असं ट्विट शोएब अख्तरनं केलं आहे.
इम्रान खान बॅकफूटवर
भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या या तणावानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळत आहे. भारताच्या एअर स्ट्राईकनंतर या हल्ल्याचं उत्तर देणार असल्याचा आणि पाकिस्तानातील जनतेला, सैन्याला येत्या काही दिवसांसाठी कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीसाठी तयार राहण्याची भाषा करणाऱ्या खान यांचा सूर आता नरमला आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर आम्ही भारताला या हल्ल्याच्या चौकशीची मोकळीक दिली होती. आम्ही आजही भारताशी चर्चेला तयार आहोत. इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शांततापूर्ण मार्गानं चर्चा करून तोडगा काढण्याची विनंती इम्रान खान यांनी केली. पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध आणि इतर युद्धांचा संदर्भ देत खान यांनी युद्धाने कधीच कोणाचं भलं झालेलं नाही हा मुद्दा मांडत पुन्हा एकदा युद्ध नसल्याचं आपलं मत माध्यमांसमोर मांडलं.
दहशतवादासाठी आमच्या देशाची भूमी वापरली जावी, असं आम्हाला वाटत नाही. भारताच्या कारवाईनंतर स्वसंरक्षणासाठी आमच्या सैन्यानं ही कारवाई केली. आम्ही भारतीय सीमा ओलांडली, पण यामध्ये कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवण्यात आलेली नाही, आणि आमचा तसा उद्देशही नव्हता, असं इम्रान खान म्हणाले.