रवि पत्की, झी मीडिया, मुंबई: कुठलीही खेळपट्टी खेळ सुरू झाल्यावर एकतर जलद असल्याचे दाखवून देते(चेंडू वेगात बॅट वर येतो) किंवा पहिल्या काही षटकांपासून स्पिन घेते.(भारतीय उपखंडातिल खेळपट्ट्या). पण अहमदाबादच्या तिसऱ्या T20 सामन्याची खेळपट्टी मजेदार होती. ती फास्ट होती आणि स्क्वेअर टर्न सुद्धा घेत होती. जनुकीय अभियांत्रिकीने एकाच झाडाला जमिनीखाली बटाटे आणि जमिनीच्या वर टोमॅटो लागतात असे पोमॅटो(पोटॅटो+टोमॅटो)नावाचे झाड तयार केले आहे. कालची खेळपट्टी तशीच संकरित पोमॅटो खेळपट्टी म्हणता येईल.तिचे अचूक चालचलन कोणत्याच तज्ञ समालोचकाला सामना सुरू होण्याआधी ओळखता आले नाही.आता भूगर्भशास्त्रज्ञा सारखे खेळपट्टीगर्भ शास्त्रज्ञ तयार करण्याची आवश्यकता आहे.खेळपट्टी कशी वागेल हे ज्या संघाला अचूक समजेल तो संघ सामना सुरू होण्याआधीच वरचढ स्थितीत असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिसऱ्या  टी 20 मध्ये मार्क वूड आणि जोफ्रा आर्चर यांचे चेंडू फलनदाज पोजिशन मध्ये यायच्या आत बॅट वर आदळत होते. तोफगोळ्याच्या वेगाने फलंदाजाच्या हेल्मेटच्या दिशेने येत होते. ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम भागातली खेळपट्टी(पर्थ - वॅका) भारताच्या पश्चिम भागात आल्याचे जाणवत होते.आदिल रशीदचे लेगस्पिन आणि गुगली झपाझप वळत होते आणि कहर म्हणजे चहाल नी बटलरला लेग स्टम्प वरून ऑफ स्टंप च्या बाहेर अति जलद जाणारा 'वॉर्न चेंडू' टाकल्यावर एकाच तिकिटात दोन पिक्चरची चैन झाली.


टी20 मध्ये पहिल्या सहा ओव्हर्स च्या पॉवरप्ले चा ODI मधल्या पहिल्या दहा ओव्हर्स सारखा सावध(बचावात्मक नव्हे) मार्ग शोधायला हवा.पहिल्या सहा ओव्हर्स मध्ये मारामारीच्या नादात विकेट्स पडल्या तर अंतिम स्कोर जेमतेम होतोय. नीट विचार केला तर बॅट्समनचे वाढलेले अफाट कौशल्य आणि वजनदार बॅट्स ह्यामुळे ग्राऊंडवरचे क्षेत्ररक्षक बरेचदा प्रेक्षकच होतात. इतके लांब लांब पूर्ण वीस ओव्हर्स उंच षटकार मारले जातात. त्यामुळे पाच,सहा,सात नंबरचे बॅट्समन ताबडतोड धुलाई करणार आहेतच हा विश्वास ठेवून पहिल्या सहा ओव्हर्स वर तुटून पडलेच पाहिजे का? ह्या कल्पनेचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. 


पहिल्या पाच सहा षटकात तीन विकेट्स पडल्या तर खालच्या फ्लनदाजावर अतिरिक्त दबाव येतो. कोहलीवर प्रत्येक सामन्यात तारणहार म्हणून अवलंबून रहाणे योग्य नाही.


काल कोहलीने पुन्हा तो एलिअन (दुसऱ्या आकाश गंगेतील असणारा पण मॅच पुरता पृथ्वीवर येणारा)असल्याचे दाखवून दिले.कुठे क्षेत्ररक्षक नाही ते बघून पुढच्या चेंडूला तशा पूरक पोजिशन मध्ये येऊन अधिकृत क्रिकेट शॉट्स नी चौकार किंवा षटकार मारणे हे फलनदाजी साठी ग्राउंड वर आलेल्या माणसाचे नव्हे तर क्रिकेटसाठी अवतार घेतलेल्या माणसाचे लक्षण आहे. अशी बॅटिंग स्टेडियम मध्ये जाऊन बघायचे ज्याला भाग्य लाभते त्या प्रेक्षकाला सुद्धा घरी गेल्यावर अनेक लोक नुसते बघायला येत असतील. कोहली अविश्वसनीय आहे. फुल स्टॉप.चर्चाच नाही.


बुमराह आणि शमीला आपण मिस करतोय.तिसऱ्या सामन्याच्या खेळपट्टीवर त्यांच्या वेगामुळे मोठाच फरक पडला असता.आपले सगळेच खेळाडू वरच्या दर्जाचे सिद्ध खेळाडू आहेत.सद्धया व्यवस्थापनाला कुणाला खेळवायचे आणि कुणाला काढायचे ही तारेवरची कसरत करावी लागतीये. ही मुबलकतेची समस्या आल्हाददायक आहे. आता प्रश्न आहे तो घेतलेले 11 रम्मीतल्या सीक्वेन्स प्रमाणे फिट्ट बसण्याचा आणि रम्मी लागण्याचा.