लंडन : इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अंडरसननं इतिहास घडवला आहे. अंडरसननं टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या फास्ट बॉलरच्या ग्लेन मॅक्ग्राच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. पाचव्या टेस्टच्या चौथ्या दिवशी अंडरसननं सुरुवातीलाच भारताला दोन धक्के दिले आणि टेस्ट क्रिकेटमध्ये स्वत:च्या विकेटची संख्या ५६३ वर पोहोचवली. ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्ग्राच्या नावावरही एवढ्याच विकेट आहेत.


धवन आणि पुजारा एलबीडब्ल्यू 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३६ वर्षांच्या अंडरसननं भारताच्या दुसऱ्या इनिंगच्या सुरुवातीच्या दोन्ही विकेट घेतल्या. आपल्या दुसऱ्याच ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर अंडरसननं शिखर धवनला एलबीडब्ल्यू केलं. तर पुजारालाही अंडरसननं एलबीडब्ल्यूच आऊट केलं. पुजाराची विकेट घेऊन अंडरसननं त्याच्या विकेटची संख्या ५६३ केली. अंडरसनची ही १४३वी मॅच आहे. ग्लेन मॅक्ग्रानं हा विक्रम १२४ टेस्ट मॅचमध्ये केला होता.


अंडरसन सर्वात यशस्वी बॉलर


अंडरसन भारताविरुद्धच्या या सीरिजमधला सगळ्यात यशस्वी बॉलर आहे. अंडरसननं या सीरिजमध्ये आत्तापर्यंत २३ विकेट घेतल्या आहेत. या सीरिजमध्ये अंडरसन वगळता इतर कोणत्याही बॉलरना २० पेक्षा जास्त विकेट घेता आल्या नाहीत. लॉर्ड्सवर झालेल्या टेस्टमध्ये अंडरसननं ९ विकेट घेतल्या. याचबरोबर त्यानं भारताविरुद्ध १०० विकेट घेण्याचा रेकॉर्डही केला. याचवेळी त्यानं लॉर्ड्सच्या मैदानात १०० विकेट घेण्याचा पराक्रमही नावावर केला. एकाच मैदानात १०० विकेट घेणारा जेम्स अंडरसन पहिला फास्ट बॉलर आहे.


अंडरसनच्या पुढे ३ स्पिनर


आता टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत अंडरसनच्या पुढे ३ स्पिनर आहेत. ८०० विकेट सह श्रीलंकेचा मुथय्या मुरलीनधरन पहिल्या क्रमांकावर, ७०८ विकेट घेणारा ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न दुसऱ्या क्रमांकावर आणि ६१९ विकेट घेणारा भारताचा अनिल कुंबळे तिसऱ्या क्रमांकावर आहे.