भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप! संजू सॅमसनचे वडील म्हणाले, `द्रविड, धोनी, रोहित, विराटने माझ्या...`
Sanju Samson Father Video: संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेमध्ये दमदार शतक झळकावल्यानंतर त्याच्या वडिलांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यांनी अत्यंत गंभीर आरोप करताना मोठ्या क्रिकेटपटूंची नावं घेतली आहेत.
Sanju Samson Father Video: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेमधील डर्बन येथील सामन्यात दमदार शतक झळकावणारा भारतीय संघाचा सलामीवर संजू सॅमसनने अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. सलग दोन टी-20 सामन्यांमध्ये शतक झळकावणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. त्याने बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यांमध्ये हा पराक्रम केला. टी-20 क्रिकेटमधील संजूची कामगिरी कायमच चर्चेत राहिली आहे. संजू हा आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सच्या संघाचा कर्णधारही आहे. मात्र असं असलं तरी त्याची भारतीय संघातील जागा निश्चित मानली जात नाही. अनेकदा तो संघाच्या आत बाहेर करताना दिसून आला आहे. मात्र विराट कोहली आणि रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर संजूला अधिक संधी मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे. असं असतानाच आता संजूच्या वडिलांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या चौघांची घेतली नावं
या व्हिडीओमध्ये संजूच्या वडिलांनी, भारताचे माजी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्र सिंह धोनी आणि प्रशिक्षक राहुल द्रविडवर गंभीर आरोप केला आहेत. या सर्वांनी मिळून माझ्या मुलाच्या करिअरमधील 10 वर्ष वाया घालवली. या चौघांनी माझ्या मुलाला भारतीय संघात खेळण्याची पुरेशी संधी दिली नाही, असा दावा संजूच्या वडिलांनी केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात संजूने शतक झळकावल्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
टीम मॅनेजमेंटवर गंभीर आरोप
सॅमसन विश्वनाथ हे दिल्ली पोलिसचे हवालदार म्हणून कार्यरत होते. त्यांनी दिल्लीकडून संतोष ट्रॉफी फुटबॉल चषक स्पर्धा खेळली आहे. मात्र त्यांनी मुलाला क्रिकेट खेळता यावं म्हणून अनेक गोष्टींना तिलांजली दिली. यामध्ये त्यांच्या नोकरीचाही समावेश आहे. त्यांनी केरळमधील एका मल्याळम प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत विश्वनाथ यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. "भारतीय टीम मॅनेजमेंटने माझ्या मुलाच्या करिअरची 10 वर्ष वाया घालवली," असं विश्वानाथ यांनी म्हटलं आहे. मात्र त्यावेळी, "माझा मुलगा ही कसर आगामी काही वर्षांममध्ये नक्की भरुन काढेन," असंही विश्वानाथ यांनी टी-20 मालिकेचा संदर्भ देत म्हटल्याचं दिसत आहे.
नक्की वाचा >> 'माझ्या मुलाबद्दल हा माणूस कधीच...,' संजूच्या वडिलांनी थेट क्रिकेटरचं नाव घेत केली टीका
नेमके काय आरोप केले?
विश्वानाथ यांनी धोनी, कोहली, रोहित शर्माबरोबर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नावाचा थेट उल्लेख केला आहे. "अशी 3 ते 4 लोक आहेत ज्यांनी माझ्या मुलाच्या करिअरमधील 10 वर्ष वाया घालवली. यामध्ये धोनी, विराट, रोहित आणि प्रशिक्षक राहुलचा समावेश आहे. या चौघांनी माझ्या मुलाच्या आयुष्यातील 10 वर्ष वायाला घावली. मात्र त्यांनी त्याला जितका त्रास दिला तितका तो अधिक शक्तीशाली होऊन या संकटातून बाहेर पडेल," असं संजूच्या वडिलांनी म्हटलं आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओच्या सत्यतेची पुष्टी 'झी 24 तास' करत नाही.