क्रिकेटच्या मैदानात `50 खोके एकदम ओके`ची बॅनरबाजी, सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या सामन्यात मैदानाबाहेरच्या या बॅनरबाजीची जोरदार चर्चा
Ind vs Aus T20 : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) शुक्रवारी दुसरा टी20 सामना (T20 Series) खेळवण्यात आला. 8 षटकांच्या या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवत मालिकेत बरोबरी केली. रोहित शर्माची (Rohit Sharma) फटकेबाजी आणि शेवटच्या षटकात अवघ्या दोन चेंडूत दिनेश कार्तिकने (Dinesh Kartik) भारताला मिळवून दिलेल्या विजयाची चर्चा झाली. पण या सामन्यात आणखी एका गोष्टीची चर्चा रंगलीय.
नागपूरच्या VCA मैदानावर रंगलेल्या या सामन्यात मैदानावर जितकी चुरस होती, तितकीच एका गोष्टीने स्टेडिअममध्येही लोकांचं लक्ष वेधून घेतलं. काही प्रेक्षकांनी मैदानावर चक्क '50 खोके एकदम ओके'चा बॅनर झळकावला. सोशल मीडियावर (Social Media) हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. कॅमेरामनने या बॅनरवर कॅमेरा फिरवताच प्रेक्षकांकडून '50 खोके एकदम ओके'ची घोषणाबाजी करण्यात आली.
विधानसभेच्या पायऱ्यांवर गाजली होती घोषणा
शिवसेनेतून बंडखोरी करुन एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदार बाहेर पडले. बंडखोरी करण्यासाठी आमदारांना 50 खोके देण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) करण्यात आला. याचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही पाहिला मिळाले. पावसाळी अधिवेशनात विधानसभेच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीकडून शिदे गटावर टीका करताना '50 खोके एकमद ओके'ची घोषणा करत टीका करण्यात आली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात हा डायलॉग चांगलाच गाजला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया आज तिसरा T20 सामना
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन टी20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातला पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला, तर नागपूरमध्ये झालेला दुसरा सामना जिंकत भारताने मालिकेत बरोबरी साधली. आज या मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना हैदराबादमध्ये खेळला जातोय. रोहितसेना हा सामना जिंकत मालिका जिंकणार का याकडे भारतीय क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.