ऑकलंड : भारताचा कर्णधार विराट कोहलीने क्रिकेटचे अनेक विक्रम स्वत:च्या नावावर केले आहेत. एक हाती मॅच फिरवण्याची क्षमता विराटमध्ये आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतकं केलेल्या विराटला भले-भले बॉलर घाबरतात. पण न्यूझीलंडचा फास्ट बॉलर टीम साऊदीला विराटची विकेट घेणं पसंत आहे. साऊदीने ऑकलंडच्या दुसऱ्या वनडेमध्ये विराटला माघारी पाठवलं. याचसोबत साऊदीने विराटची सर्वाधिक वेळा विकेट घेण्याचा विक्रम केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा २२ रनने पराभव झाला. न्यूझीलंडने ठेवलेल्या २७४ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. विराट कोहलीने २५ बॉलमध्ये १५ रन केले. टीम साऊदीने विराटला बोल्ड केलं. वनडे क्रिकेटमध्ये साऊदीने विराटला ६ वेळा आऊट केलं आहे. यातल्या ५ वेळा विराट कॅच आऊट तर एकदा बोल्ड झाला.


टीम साऊदीने विराटला टेस्ट मॅचमध्ये २ वेळा आणि टी-२०मध्ये एकदा माघारी पाठवलं आहे. तिन्ही फॉरमॅट मिळून टीम साऊदीने विराटची ९ वेळा विकेट घेतली आहे. विराटला एवढेवेळा आऊट करण्याचा हा विश्वविक्रम आहे.


तिन्ही फॉरमॅटमध्ये साऊदीनंतर इंग्लंडच्या जेम्स अंडरसन आणि ग्रॅम स्वानने विराटची सर्वाधिक वेळा विकेट घेतली. अंडरसन आणि स्वानने विराटला ८ वेळा पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.


वनडे क्रिकेटमध्ये टीम साऊदीनंतर वेस्ट इंडिजच्या रवी रामपॉलने विराटची सर्वाधिक वेळा विकेट घेतली. रामपॉलने साऊदीप्रमाणेच विराटला ६ वेळा आऊट केलं. श्रीलंकेच्या थिसारा परेरा आणि ऑस्ट्रेलियाच्या एडम झम्पाने विराटला ५-५ वेळा परत पाठवलं.