Shahzaib Rindh on Tiranga: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना असं ऐकलं तरी दोन्ही देशातील क्रीडाप्रेमींच्या अंगात संचारत. पाकिस्तान हा भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे क्रिकेटचे मैदान असो वा हॉकीचे..कोणत्याही सामन्यात रोमांच पाहायला मिळतो. दोन्ही देशांतील खेळाडू, चाहत्यांसाठी हा सामना प्रतिष्ठेचा बनलेला असतो. अशावेळी एकमेकांविरुद्ध मानापमानाचे उच्चार केले जातात. पण कराटेच्या मैदानावर एक वेगळा प्रसंग पाहायला मिळाला. यामुळे दोन्हीकडचे क्रीडाप्रेमींचे डोळे उघडले आहेत. काय घडला हा प्रसंग? जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा राणा सिंग आणि पाकिस्तानचा शाहजेब रिंध हे कराटेच्या स्पर्धेत आमनेसामने होते. दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा सुरू होती. भारताने यातील एक सामना जिंकला होता तर पाकिस्तानने एक सामना जिंकला होता. क्रिकेट, हॉकी अशा इतर कोणत्याही खेळात दिसणारी चुरस येथे दिसत होती. तिसरा सामना झाला आणि यात पाकिस्तानी खेळाडू शाहजेब रिंधने विजय मिळवला. 


पाकिस्तानी खेळाडू शाहजेबने हा सामना 2-1 असा जिंकला. मात्र विजयापेक्षा शाहजेबच्या वक्तव्याची सगळीकडे चर्चा आहे. त्याचा हा व्हिडीओ जगभरात व्हायरल होतोय.  pakistaninpics नावाच्या युजरने या सामन्याचा व्हिडिओ X या सोशल मीडिया वेबसाइटवर पोस्ट केला आहे.
पाकिस्तानी खेळाडूचा एक सुंदर आणि दमदार संदेश असे कॅप्शन याला देण्यात आलंय. 


पाकिस्तानचा शाहजेब रिंध याने भारताविरुद्ध सामना जिंकला. त्यानंतर त्याने भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांचे झेंडे आपल्या हातात घेतल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी अॅंकरने त्याला तुम्ही दोन झेंडे घेऊन आहात, याचे कारण काय? असा प्रश्न विचारला. यावर शाहजेबने उत्तर दिले.. 



 


लढा शांततेसाठी


'हा भारताचा ध्वज आहे आणि हा पाकिस्तानचा आहे. हा लढा शांततेसाठी आहे. आम्ही एकमेकांचे शत्रू नाहीत. आम्ही एकत्र आहोत. आम्ही एकत्रपणे काहीही करू शकतो. राजकारण वगैरे आम्हाला वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हाला एकत्र राहायचे आहे.' असे वक्तव्य त्याने केले. 


सलमान खानचा चाहता


तुम्ही मॅचच्या आधी पत्रकार परिषदेत असं काही बोलला नाहीत, असे अ‍ॅंकरने त्याला विचारला. दरम्यान आपण सलमान खानचे चाहते असल्याचे त्याने सांगितले.  बॉलिवूड अभिनेता सलमान खानचाही उल्लेख करत आपण लहानपणापासून सलमानचे सिनेमे पाहतोय, असे सांगितले. तसेच सामना पाहण्यासाठी आल्याबद्दल त्याने सलमानचे आभारदेखील मानले. सामना संपल्यानंतर शाहजेबने सलमान खानचीही भेट घेतली. ज्याचा व्हिडिओही समोर आला होता. सलमानने शाहजेबच्या खेळाचेही कौतुक केले आण त्याला करिअरसाठी शुभेच्छाही दिल्या.