दक्षिण आफ्रिकेविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघात बदल करण्यात आला आहे. जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे. मोहम्मद शमी जखमी असून त्याच्या जागी बीसीसीयआने आवेश खानला संधी दिली आहे. केपटाऊनमध्ये न्यूलँड्स येथे 9 जानेवारीपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिका 0-1 ने आघाडीवर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, पुरुषांच्या निवड समितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 ते 7 जानेवारी 2024 दरम्यान केपटाऊन येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी मोहम्मद शमीच्या जागी आवेश खानची निवड केली आहे. 



आवेश खान दक्षिण आफ्रिकेविरोधातील एकदिवसीय मालिकेचा भाग होता. तीन सामन्यांच्या मालिकेत त्याने 6 विकेट्स मिळवल्या होत्या. आवेशने 38 प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये 149 विकेट्स मिळवले आहेत. 


 


कसा असेल भारतीय संघ?


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह  प्रसिद्ध कृष्णा, केएस भरत (वि.), अभिमन्यू ईश्वरन, आवेश खान


रोहित शर्मा गोलंदाजांवर नाराज


रोहित शर्माने सामन्यानंतर म्हटलं की, "ही 400 धावा उभारु शकणारी खेळपट्टी नव्हती. आम्ही फार धावा दिल्या. आम्ही प्रत्येक ठिकाणी चेंडू टाकल्यानंतरही असं झालं. तुम्ही फक्त एका गोलंदाजावर (बुमराह) अवलंबून राहू शकत नाही. इतर तीन गोलंदाजांनी आपली भूमिका नीट निभावण्याची गरज आहे. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांकडून आम्ही खूप काही शिकू शकतो".


गोलंदाजांकडून पूर्ण प्रयत्न झाले हे मान्य करताना रोहित शर्माने बुमराह एकटाच फलंदाजांवर दबाव आणू शकत नाही असंही म्हटलं. "बुमराहने फार चांगली गोलंदाजी केली. आपल्या सर्वांनाच तो किती उत्तम फलंदाज आहे याची जाणीव आहे. पण हे होत असतं. तिघांनीही फार प्रयत्न केले. पण आम्हाला हवं होतं तसे निकाल मिळाले नाहीत. पण असे सामने तुम्हाला खूप काही शिकवतात. जसं की गोलंदाजीत तुम्ही काय सुधारणा करु शकता," असं रोहित म्हणाला. 


प्रसिद्ध कृष्णा याच्याकडे फक्त 12 प्रथम श्रेणी सामन्यांचा अनुभव आहे. त्याने पदार्पणातील पहिल्याच सामन्यात 20 ओव्हर्समध्ये 93 धावा दिल्या. रोहित शर्माने प्रसिद्धला अनुभव नसल्याचं मान्य करताना, संघ त्याच्यावर यापुढेही विश्वास दाखवणार असल्याचं म्हटलं आहे. 


"तो नक्कीच नवखा असून, त्याच्या गाठीशी अनुभव नाही. पण त्याच्याकडे या स्तरावर खेळण्यासाठी लागणारा अनुभव आहे. जर तुम्ही आमच्याकडे उपलब्ध असणारे गोलंदाज पाहिले तर त्यातील काही जखमी असून, काहीजण उपलब्ध नाहीत. त्यामुळे आम्ही परिस्थितीच्या आधारे जे उपलब्ध आहेत त्यांची निवड करत आहोत," असं रोहित शर्मा म्हणाला.


"तो जास्त कसोटी खेळलेला नाही हे मी समजू शकतो, पण संघात आणखी तीन गोलंदाज आहेत, ज्यांनीही जास्त कसोटी खेळलेली नाही. पण त्यांना संघाला कोणत्या गोष्टींची गरज आहे हे दाखवून दिलं आहे. तुम्ही फक्त शरिराचा नाही तर डोक्याचाही वापर करायचा असतो. तुम्ही तुमच्या मेंदूचा कसा वापर करता आणि खेळात त्याचा काय फायदा होतो हे महत्त्वाचं आहे," असं रोहितने स्पष्टच सांगितंलं.


"जेव्हा तुम्हाला संधी मिळते तेव्हा तुम्ही त्यासाठी आभार मानत संघासाठी मेहनत घ्यायला हवी. त्याच्यासाठी नक्कीच हा सामना फार चांगला नव्हता. पहिल्या सामन्यात अनेकजण दबावात असतात. तोदेखील दबावात असू शकतो," असं रोहित म्हणाला. पुढे त्याने सांगितलं की, "अशा गोष्टी होत असतात. पण आमचा त्याला पाठिंबा असेल".