भारतीय क्रिकेटर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांनी आपले वेगळे मार्ग निवडल्याचं बोललं जात आहे. याचं कारण युझवेंद्र चहलने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पत्नी धनश्रीचे सर्व फोटो डिलीट केले आहेत. यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण धनश्रीने मात्र तिच्या अकाऊंटवर युझवेंद्र चहलचे फोटो ठेवले आहेत. यामुळे नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या असून, नेमकं काय सुरु आहे याबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. यादरम्यान चहलने इंस्टाग्रामला एक पोस्ट शेअर केली आहे. 


चहलने पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शांतता ही त्या लोकांसाठी गहन संगीत आहे, जे गोंधळातही ती जास्त ऐकू येते असं चहलने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 



याआधी शनिवारी रात्री चहलने एक उपहासात्मक पोस्ट शेअर केली होती, ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. चहलने थेटपणे धनश्रीसोबतच्या नात्यावर भाष्य केलं नव्हतं, मात्र ही पोस्ट त्यासंदर्भात होती असा अंदाज लावला जात आहे. 


"कठोर परिश्रम लोकांच्या चारित्र्यावर प्रकाश टाकतात. तुम्हाला तुमचा प्रवास माहित आहे. तुम्हाला तुमची वेदना माहित आहे. तुम्ही इथपर्यंत पोहोचण्यासाठी काय केले हे तुम्हाला माहिती आहे. जगालाही माहिती आहे. तुम्ही उंच उभे आहात. तुम्ही तुमचे वडील आणि आईला अभिमान वाटावा अशी कामगिरी करण्यासाठी घाम गाळळा आहे. एका अभिमानी मुलासारखे नेहमी उंच उभे राहा,” असं त्याने पोस्टमध्ये लिहिलं होतं. 



घटस्फोटाच्या चर्चांमागे कारण काय?


युझवेंद्र आणि धनश्री यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्यामुळे शनिवारी दोघांच्या संभाव्य घटस्फोटाच्या अफवा पसरल्या. त्यांच्या जवळच्या काही लोकांनी मतभेत झाल्याने घटस्फोट घेतला जात असल्याचा दावा केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोघेही मागील अनेक काळापासून वेगळे राहत आहेत. पण दोघांनी अद्याप यावर अधिकृतपणे भाष्य केलेलं नाही. 


याआधी 2022 मध्येही दोघांच्या नात्यात दुरावा असल्याची चर्चा होती. याचं कारण तेव्हा धनश्रीने आपल्या नावातून 'चहल' आडनाव हटवलं होतं. पण नंतर त्यांनी पोस्ट करुन सर्व काही आलबेल असल्याचं म्हटलं होतं. 


धनश्री वर्मा कोरिओग्राफर आहे. तिचे इंस्टाग्रामवर 62 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर 2020 मध्ये दोघे विवाहबंधनात अडकले होते. 'झलक दिखला जा' या रिअॅलिटी शोमध्येही ते सहभागी झाले होते.