Sunil Chhetri on Poor Performance in Olympic: भारताचा दिग्गज खेळाडू सुनील छेत्री (Sunil Chhetri) आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. त्यातही जेव्हा कधी भारतातील क्रीडा संस्कृतीचा विषय येतो, तेव्हा तो परखडपणे आपलं मत मांडतो. नुकतंच सुनील छेत्रीने ऑलिम्पिकमध्ये (Olympic) भारताला अपेक्षित यश का मिळत नाही यावर भाष्य केलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील 7 पदकं ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये यापेक्षा उत्तम कामगिरी करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. दरम्यान भारताची ऑलिम्पिक पदक जिंकताना इतकी दमछाक का होते याचं कारण सुनील छेत्रीने सांगितलं आहे. 150 कोटी लोकसंख्या असतानाही भारत इतका पिछाडीवर का आहे हे सांगताना सुनील छेत्रीने नाराजी जाहीर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पॉडकास्टमध्ये हजेरी लावलेल्या सुनील छेत्रीने सांगितलं की, तळागाळातील प्रतिभा ओळखण्यात आणि त्यांना वाव देण्यात भारताला यश न मिळाल्याने जागतिक स्तरावर पदकं मिळवण्यात अपयश येत आहे.


"आपली 150 कोटी लोकसंख्या असूनही (ऑलिम्पिकमध्ये) पदके जिंकू शकत नाही हे वस्तुस्थितीनुसार योग्य नाही.  खरं तर आपण 150 लोकांची प्रतिभा ओळखू शकत नाही आणि त्यांना तसा वावही देत नाही. चीन, अमेरिका, जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा यांच्यासह जे देश ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करतात ते आपल्यापेक्षा कित्येक पटीने चांगले आहेत," असं सुनील छेत्री म्हणाला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.



सुमारे 1.5 अब्ज लोकसंख्येचा देश अधिक प्रतिभा निर्माण करण्यास सक्षम असला पाहिजे आणि भारताकडे प्रतिभा असूनही, त्यांना पुढील स्तरावर नेण्यासाठी त्यांचे पालनपोषण करण्यावर फारसे लक्ष दिले जात नाही अशी खंत सुनील छेत्रीने मांडली आहे. 


"जेव्हा लोक म्हणतात, आपल्या देशात प्रतिभेची कमतरता नाही, ते 100 टक्के बरोबर आहे. अंदमानमधील एक पाच वर्षांचा मुलगा, जो फुटबॉल किंवा भालाफेक किंवा क्रिकेटमध्ये चांगला होता त्यालाच माहिती नीही. एक-दोन थ्रो फेकल्यानंतर आता कॉल सेंटरमध्ये काम करत आहे,” अशी नाराजी सुनील छेत्रीने मांडली. 


यावेळी त्याने कोणी आपली हत्या केली तरी चिंता नाही मात्र हे सत्य आहे असंही स्पष्टपणे म्हटलं. "प्रतिभा ओळखण्यात आणि योग्य वेळी आणि योग्य कार्यपद्धतीने त्याचं पालनपोषण करण्यात आपण खूप मागे आहोत. यासाठी लोक मला मारून टाकू इच्छित असल्यास मला पर्वा नाही; पण हे वास्तव आहे," असंही तो म्हणाला.