मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची कामगिरी म्हणजे सध्या क्रीडा वर्तुळातील सर्वाधिक चर्चेचा विषय. महिला संघातील खेळाडूंचा खेळ आणि पुरुष संघालाही लाजवेल असा त्यांचा अंदाज म्हणजे क्रीडारसिकांसाठी एक परवणीच. अशा या संघातील खेळाडू शेफाली वर्मा  shafali verma  हिने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या अफलातून खेळीचं प्रदर्शन करत साऱ्या जगालाच याची दखल घ्यायला भाग पाडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेफाली/ शफाली ही आता जगातील अव्वल स्थानी असणारी महिला क्रिकेटपटू ठरली आहे.  (Womens T20 World Cup 2020) महिला टी२० विश्वचषक स्पर्धेतही सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये ती अग्रस्थानी आहे. शेफाली आज ज्या टप्प्यावर आहे, तेथे तिच्यावर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. पण, इथवर पोहोचण्याचा तिचा प्रवास काही सोपा नव्हता. 


बऱ्याच संघर्षांना सामोरं जात आपल्या खेळाच्या आड आलेल्या प्रत्येक आव्हानाला तिने जिद्दीने तोंड दिलं. इतकंच नव्हे, तर पुरुष क्रिकेट संघात ती भावाच्या अनुपस्थित त्याच्या जागी खेळली. फक्त खेळलीच नाही, तर त्या स्पर्धेत तिने सर्वोत्कृष्ट खेळाडू हा बहुमानही पटकावला. एका मुलीसाठी सौंदर्याची परिभाषा अनेकदा महत्त्वाची असते. पण, याचाही विचार न करता तिने क्रिकेटप्रती असणारी ओढ जपत केस कापण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर शेफाली सध्या ज्या रुपात दिसते, हीच तिची नवी ओळख ठरली. 



सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, ब्रेट ली अशा दिग्दज खेळाडूंनीही शेफालीच्या खेळाची प्रशंसा केली आहे. किरकिर्दीत वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षीच उत्तुंग शिखरावर पोहोचणाऱ्या शेफालीचं हेच यश पाहता, आयसीसीकडून तिच्याविषयीचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये शेफाली या खेळामध्ये पदार्पण करण्यापासूनचा आतापर्यंचा तिचा प्रवास उलगडला गेला आहे. 


पाहा : 'येसूबाईं'ना नाही आवरला लाठीकाठी खेळण्याचा मोह; व्हिडिओ व्हायरल



शेफालीचे वडील क्रिकेट खेळत होते. पण, काही कारणास्तव त्यांचं या खेळाविषयी असणारं स्वप्न पुढे जाऊ शकलं नाही. त्यामुळे त्यांनी हे स्वप्न मुलांच्या सहाय्याने साकार होताना पाहिलं. शेफाली सहसा मुलांसोबत क्रिकेट खेळत असे. पण, तिला मुलं खेळायला देत नसल्याचं वडिलांना सांगत अखेर या खेळापोटीच तिने केस कापण्याचा निर्णय घेतला. बऱ्याच गोष्टींमध्ये संघर्ष केल्यानंतर अखेर शेफालीला मुलींच्या अकादमीत प्रवेश मिळाला. ज्यानंतर तिने सर्वस्वाने स्वत:ला या खेळात झोकून दिलं. शेफालीचा हा प्रवास अनेकांना हेवा वाटेल असाच. पण, तिने इथवर पोहोचण्यासाठी केलेला संघर्ष दुर्लक्षित करुन चालणार नाही.