लंडन : भारतीय महिला क्रिकेट संघाने दुसऱ्या टी 20 सामन्यात इंग्लंडचा 8 धावांनी पराभव केला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 149 धावांचे आव्हान दिले होते. मात्र इंग्लंडला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 140 धावाच करता आल्या. टीम इंडियाकडून पूनम यादवने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर इतर गोलंदाजांनी पूनमला चांगली साथ दिली. हा दुसरा सामना जिंकल्याने भारतीय संघाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधत सीरिजमधील आव्हान कायम ठेवले आहे. (indian womens cricket team beat england by 8 runs in 2nd t 20i and level series) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडचा डाव


विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या इंग्लंडला टीम इंडियाच्या गोलंदाजांनी झटपट 2 धक्के दिले. मात्र त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी करण्यात आली. त्यामुळे सामना इंग्लंडच्या बाजूने झुकला. मात्र त्यानंतर भारतीय महिला गोलंदाजांनी जोरदार कमबॅक केलं. तसेच धमाकेदार फिल्डिंगच्या जोरावर इंग्लंडच्या 4 फलंदाजांना रनआऊट केलं. निर्णायक क्षणी केलेल्या धमाकेदार फिल्डिंगच्या जोरावर भारताचा 8 धावांनी विजय झाला.



इंग्लंडकडून सलामीवीर टॅमी ब्यूमॉन्टने सर्वाधिक 59 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर कर्णधार हेदर नाईटने 31 धावा केल्या. या दोघांचा अपवाद वगळता भारतीय गोलंदाजांनी उर्वरित फलंदाजांना मैदानात टीकू दिले नाही. 


टीम इंडियाची बॅटिंग


दरम्यान त्याआधी इंग्लंडने टॉस जिंकून टीम इंडियाला फिल्डिंगसाठी भाग पाडले. टीम इंडियाची शानदार सुरुवात झाली.  स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा या सलामी जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांची पिसं काढली. या जोडीने पहिल्या 8.5 ओव्हरमध्ये 70 धावांची सलामी भागीदारी केली. मात्र त्यानंतर स्मृती 20 धावा करुन माघारी परतली. मात्र त्यानंतर लगेचच शेफाली 48 धावांवर आऊट झाली. अवघ्या 2 धावांनी तिचं अर्धशतक हुकलं. यानंतर ठराविक अंतराने भारताने गमावल्या त्यामुळे निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 148 धावाच करता आल्या. 


मालिका बरोबरीत


दरम्यान भारताने दुसरा सामना जिंकल्याने आता 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी आहे. त्यामुळे सीरिजमधील तिसरा आणि अखेरचा सामना हा येत्या 14 जुलैला खेळवण्यात येणार आहे. सीरिज आणि दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा असणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकून कोणता संघ मालिका पटकावणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.