IPL 2020 : चेन्नईचा मुकाबला राजस्थानशी, खेळाडूंची अनुपस्थिती स्मिथसाठी डोकेदुखी
आयपीएलच्या यंदाच्या मोसमातले आतापर्यंतचे सामने नेहमीप्रमाणेच रोमांचक झाले आहेत.
शारजाह : आयपीएलच्या यंदाच्या मोसमातले आतापर्यंतचे सामने नेहमीप्रमाणेच रोमांचक झाले आहेत. स्पर्धेच्या चौथ्या दिवशी चेन्नई आणि राजस्थान यांच्यात मॅच होणार आहे. या मॅचमध्ये चेन्नईचा पगडा भारी आहे, कारण राजस्थानच्या टीमपुढे खेळाडूंची अनुपस्थिती डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात मुंबईविरुद्ध विजय मिळवल्यानंतर चेन्नईची टीम सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरेल. या मॅचमध्ये विजय झाला तर चेन्नईची टीम पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर जाईल.
शारजाहमध्ये होणाऱ्या या मॅचमध्ये राजस्थानचे अनेक दिग्गज खेळाडू दिसणार नाहीत. बेन स्टोक्स आपल्या आजारी वडिलांसोबत न्यूझीलंडमध्ये आहे. तर जॉस बटलर पहिल्या मॅचमधून बाहेर आहे, कारण तो आपल्या कुटुंबासोबत वेगळा दुबईमध्ये आला आहे. कोरोना व्हायरसमुळे दुबईमध्ये ३६ तास क्वारंटाईन होणं गरजेचं आहे. स्टिव्ह स्मिथ कनकशन दुखापतीतून सावरला आहे. राजस्थानच्या टीमसाठी हा दिलासाच म्हणावा लागेल. इंग्लंडविरुद्धच्या सीरिजवेळी नेटमध्ये सराव करताना स्मिथच्या डोक्याला दुखापत झाली होती.
मुंबईविरुद्धच्या सामन्यामध्ये विजय मिळवून दिलेली टीमच धोनी पुन्हा मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राजस्थानच्या टीममधून मुंबईकर यशस्वी जयस्वालचं खेळणं जवळपास निश्चित आहे. स्थानिक क्रिकेट आणि अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी केल्यामुळे जयस्वालकडून अपेक्षा उंचावल्या आहेत.
चेन्नईची संभाव्य टीम
बॅट्समन : मुरली विजय, शेन वॉटसन, फाफ डुप्लेसिस, अंबाती रायुडू
बॉलर : पियुष चावला, दीपक चहर, लुंगी एनगिडी
ऑलराऊंडर : रवींद्र जडेजा, केदार जाधव, सॅम करन
विकेट कीपर : महेंद्रसिंग धोनी
राजस्थान रॉयल्स
बॅट्समन : स्टिव्ह स्मिथ, डेविड मिलर, यशस्वी जयस्वाल, रॉबिन उथप्पा
बॉलर : जोफ्रा आर्चर, टॉम कुरेन, जयदेव उनाडकट, श्रेयस गोपाल
ऑलराऊंडर : रियान पराग, महिपाल लोमरोर
विकेटकीपर : संजू सॅमसन