अबुधाबी : मागील सामन्यांत उत्तम कामगिरी करूनही पराभूत झालेल्या मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात आजचा सामना रंगणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्या शेवटच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला 224 धावांचे लक्ष्य दिले. पण तरी देखील पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसरीकडे पोलार्ड आणि ईशान किशनच्या शानदार डावामुळे मुंबईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध 202 धावांचे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न केला, परंतु मुंबईने सुपर ओव्हरमध्ये हा सामना गमवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे दोन्ही संघ चमकदार कामगिरी करत आहेत परंतु छोट्या छोट्या चुकांमुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागतोय. मागच्या सामन्यात अगदी फॉर्मात असलेल्या मोहम्मद शमीने चार ओव्हरमध्ये 53 धावा दिल्या आणि तीन विकेट्स घेतल्या. लेगस्पिनर रवी बिश्नोई वगळता मागच्या सामन्यात कोणताही गोलंदाज प्रभावी ठरला नाही. कर्णधार केएल राहुलने मात्र अत्यंत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आपल्या गोलंदाजांच्या उत्साहाला प्रोत्साहन दिले. त्याला आता त्याच्या गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.


किंग्ज इलेव्हन पंजाबचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलला अजून संधी मिळालेली नाही. पण राहुल आणि मयांक अग्रवाल यांच्या शानदार कामगिरीमुळे त्यांची फलंदाजी मजबूत दिसत आहे. मुंबईला सामना जिंकायचा असेल तर या दोघांना लवकर आऊट करावे लागणार आहे.


मुंबईची फलंदाजी आणि गोलंदाजी विभाग बर्‍यापैकी संतुलित दिसत आहे. त्याच्याकडे कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनसारखे फलंदाज आहेत. त्यानंतर पोलार्ड आणि हार्दिक पंड्यासारखे आक्रमक फलंदाज आहेत.


स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा फॉर्म मुंबईसाठी अजूनही चिंतेचा विषय आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये त्यांच्या कामगिरीमध्ये सातत्य नसल्याचे दिसून आले आहे. बुमराहने तीन सामन्यांत तीन गडी बाद केले असून तो प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला आहे.