IPL 2020: बंगळुरु विरुद्ध विजयासह पंजाबचं स्पर्धेतील आव्हान कायम
पंजाबने आरसीबीचा 8 गडी राखून पराभव केला.
शारजाह : आयपीएल 2020 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा सलग पराभवानंतर गुरुवारी विजय झाला. पंजाबने आरसीबीचा 8 गडी राखून पराभव केला. सामन्यात नाबाद 61 धावा करणारा पंजाबचा कर्णधार केएल राहुल 'सामनावीर' ठरला. त्याने विजयानंतर म्हटलं की, 'मला आशा आहे की संघ ही लय कायम ठेवेल.'
केएल राहुल म्हणाला की, 'आम्हाला माहित होतं की आम्हाला एकदा विजय मिळवावा लागेल, यामुळे आत्मविश्वास वाढेल. पॉइंट टेबलमध्ये सर्वात खाली असलेल्या टीमपेक्षा आम्ही चांगले आहोत. शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना गेला. पण लक्ष्य गाठण्यात आम्हाला आनंद झाला. संघातील खेळाडूंच्या कौशल्यात कोणतीही कमतरता भासली नाही, परंतु दिल्ली कॅपिटलशी झालेल्या पहिल्या सामन्यापासून मिळालेल्या संधींचा आम्ही भांडवल करण्यात अपयशी ठरलो.'
आयपीएल स्पर्धेच्या 13 व्या सत्रातील पहिला सामना खेळणार्या ख्रिस गेलने पंजाबच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. फलंदाजीमध्ये 53 धावांचे योगदान देणार्या गेलने म्हटलं की, मी चिंतेत नव्हतो. 'युनिव्हर्स बॉस' ची ही बॅट आहे, मी चिंताग्रस्त कसे होऊ शकतो.'
डावाची सुरुवात करणारा गेल या सामन्यात तिसर्या क्रमांकावर फलंदाजीला आला. तो म्हणाला की, 'संघाने मला हे सांगितले आणि हा मुद्दा नव्हता. सलामीवीर आम्हाला चांगली सुरुवात देत आहेत आणि तिथे बदल करणं योग्य नाही.'