मुंबई : नुकत्याच हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने विजय मिळवला आहे. IPLच्या 14 व्या हंगामात पहिलाच सामना हा सुपरओव्हरपर्यंत पोहोचला होता.या ओव्हरमध्ये शिखर धवन आणि पंतने फलंदाजी करून सामन्यावर आपला विजय निश्चित केला. तर गोलंदाजीत अक्षर पटेलनं महत्त्वाची भूमिका बजावली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच आता दिल्ली कॅपिटल्स संघाला एक मोठा धक्का बसला आहे. संघातील स्टार खेळाडू रविचंद्र अश्विनने IPLमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. संघात नुकताच अक्षर पटेल कोरोनावर मात करून आला आणि सामना जिंकल्याचा आनंद द्विगुणीत होत असताना आर अश्विननं काही कारणांमुळे ब्रेक घेतला आहे.




आर अश्विननच्या या निर्णयाला संघाने तसंच फ्रांचायझीने देखील सपोर्ट केला आहे. दिल्ली कॅपिटल्सने याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. तसंच अश्विननं देखील आपल्या ट्वीटरवर आपण का ब्रेक घेत आहोत याचं कारण स्पष्ट केलं आहे. 



अश्विनने ट्वीटरवर याबाबत माहिती दिली. त्याने ट्विट करुन म्हटले आहे की मी मंगळवारपासून यंदाच्या आयपीएलमधून ब्रेक घेत आहे. 'माझे कुटुंब कोव्हिड 19 विरूद्ध लढाई लढत आहे आणि मला या कठीण काळात मला त्यांची साथ द्यायची आहे. जर गोष्टी योग्य दिशेने गेल्या तर मी परत येईन अशी आशा करतो.'  


27 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना होणार आहे. या सामन्यासाठी आर अश्विन अनुपस्थित असेल. त्याच्याशिवाय दिल्ली संघ मैदानात उतरणार आहे. हैदराबादला पराभूत केल्यानंतर दिल्ली संघ पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचलं आहे. तर हैदराबाद संघाला चौथा पराभव स्वीकारावा लागला आहे.