IPL 2023 : रिंकू सिंह उभारतोय स्वप्नांचा डोलारा, बड्या नेत्यांनाही लाजवेल त्याचा हा निर्णय
IPL 2023 : रिंकू सिंह क्रिकेटच्या मैदानातच नव्हे, तर मैदानाबाहेरही जिंकतोय सर्वांची मनं. समाजाप्रती आपलं देणं आणि क्रिकेट विश्वाची अशी परतफेड करण्याचा त्याचा निर्णय पाहून म्हणाल.... कमाल लेका!
IPL 2023 : असं म्हणतात, की दिवस बदलायला वेळ लागत नाही. आयपीएलच्या निमित्तानं प्रकाशझोतात आलेल्या क्रिकेटपटू रिंकू सिंह याच्याकडे पाहताना त्याचीच प्रचिती येते. प्रचंड जिद्द, चिकाटी आणि इच्छाशक्तीच्या बळावर रिंकूनं अपयश पचवत अखेर यशाच्या शिखराच्या दिशेनं वाटचाल सुरु केली. प्रवास खडतर होता, परीक्षा पाहणारा होता. पण, समोर आलेली सर्व आव्हानं परतवून लावत रिंकू सिंह यानं त्यावर टिच्चून उभं राहून दाखवलं.
सध्या रिंकू सिंह हे नाव अनेकांच्याच ओळखीचं असलं तरीही ज्या क्रिकेट जगतानं त्याला ही ओळख दिली त्याच विश्वास सुरुवातीचे दिवस त्याच्यासाठी अतिशय खडतर होते. उत्तर प्रदेशातील अलिगढमध्ये जन्मलेल्या रिंकूच्या कुटुंबाती आर्थिक परिस्थितीसुद्धा बेताचीच होती. बालपणी त्यानं पाहिलेल्या दिवसांबाबत कळलं की आपल्याला बऱ्याच सुविधा मिळाल्याची बाब अनेकांच्या लक्षात आली. हाच रिंकू आता त्याचं आयुष्य बदलणाऱ्या क्रिकेट विश्वाच्या उपकारांची परतफेड करण्याच्या तयारीला लागला आहे. (IPL 2023 News kkr Rinku Singh Building a Hostel for Underprivileged ypung Cricketers in Aligarh latest news)
लेका... तुझ्या पंखांना आणखी बळ मिळो!
क्रिकेटच्या मैदानात आपला प्रवास सुरु ठेवत असतानाच त्यानं मैदानाबाहेरही आपल्या स्वप्नांचा डोलारा उभारण्यास सुरुवात केली आहे. थोडक्यात हा रिंकू सध्या नवोदित गरजू क्रिकेटपटूंसाठी एक वसतीगृह (Hostel) उभारण्याची तयारी करत आहे.
हेसुद्धा वाचा : Who Is Rinku Singh? एकेकाळी साफसफाई करणाऱ्या रिंकूने आज मैदान मारलंय; वाचा संघर्षाची कहाणी!
अलिगढमध्येच रिंकूनं या स्वप्नाची सुरुवात केली असून, त्याच्या या वसतीगृहामध्ये जवळपास 50 नवख्या आणि गरजवंत क्रिकेटपटूंना आसरा मिळण्यासोबतच त्यांना मुलभूत सुविधाही मिळतील. या साऱ्यासाठी तो लाखोंचा खर्चही करताना दिसत आहे.
कसं असेल हे वसतीगृह?
रिंकूचे प्रशिक्षक Masood Uz Zafar Amini यांनी एका माध्यमसमुहाशी संवाद साधताना हे वसतीगृह नेमकं कसं असेल यावरून पडदा उचलला. या वसतीगृहात 14 खोल्या असून तिथं 50 मुलांच्या राहण्याची सोय होईल. उपहारगृहाचीही इथं सो असेल. जेणेकरून तिथं राहणाऱ्या मुलांच्या आहाराचीही उत्तम व्यवस्था होऊ शकेल, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी ही संकल्पना पूर्णपणे रिंकूचीच असल्याचंही त्याच्या प्रशिक्षकांनी म्हटलं.
जवळपास 7 महिन्यांपासून हे काम सुरु असून, सध्याच्या घडीला 90 टक्के बांधकाम पूर्ण झाल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिली. यंदाच्या वर्षात रिंकूचं हे स्वप्न साकार होणार आहे. या वास्तूच्या उदघाटनासाठी क्रिकेट जगतातील काही नामवंत चेहऱ्यांची हजेरी असेल. अर्थात रिंकू त्यातलंच एक नाव. लहानपणापासून आपल्याला काही काराणास्तव, परिस्थितीमुळं काही सुविधा मिळाल्याही नसतील. पण, येणाऱ्या पिढीला मात्र त्या सुविधा मिळाव्यात यासाठी रिंकूनं उचललेलं पाऊल स्तुत्य ठरत आहे. इतकंच नव्हे, तर भरकटणाऱ्या मुद्द्यांवरून राजकारण करणाऱ्या देशातील बड्या नेत्यांच्या डोळ्यांत अंजनही घालत आहे, असंच अनेकांचं मत.