Who Is Shashank Singh Auction Confusion Preity Zinta Connection: इंडियन प्रिमीअर लीगमधील मागील अनेक सामने एकतर्फी झाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांना गुरुवारी रोमहर्षक सामना पाहायला मिळाला. स्पर्धेतील 17 व्या सामन्यामध्ये गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स इलेव्हनचे संघ आमने-सामने आले आणि हा सामना अगदी शेवटून दुसऱ्या बॉलपर्यंत रंगला. गुजरातचा कर्णधार शुभमन गीलने नाबाद 89 धावांची खेळी करत संघाची धावसंख्या 20 ओव्हरमध्ये 199 धावांपर्यंत नेली. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाबचे आघाडीचे फलंदाज स्वस्तात तंबूत परतले. मात्र मधल्या फळीत फलंदाजीसाठी आलेल्या शशांक सिंहने संघाला सामना जिंकून दिला. घरगुती क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या शशांकने 29 बॉलमध्ये नाबाद 61 धावा करत संघाचा विजय सुखकर केला. त्याने 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने ही महत्त्वपूर्ण खेळी केली. संघाला कायम स्मरणात राहील असा विजय मिळवून देत शशांक शेवटपर्यंत नाबाद राहिला. मात्र पंजाबाला विजय मिळवून देणाऱ्या शशांकला आयपीएलच्या लिलावामध्ये विकत घेतल्यानंतर संघाला पश्चाताप झालेला असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.


नेमका काय गोंधळ झाला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर शशांकच्या लिलावाच्या वेळेस मोठा गोंधळ निर्माण झाला होता. आयपीएल 2024 च्या लिलावादरम्यान पंजाब किंग्स इलेव्हनची सहमालकीण असलेली अभिनेत्री प्रिती झिंटा आणि नेस वाडिया गोंधळून गेले. त्यांनी अनकॅप खेळाडू असलेल्या शशांक सिंहवर बोली लावली आणि ती जिंकली. मात्र नंतर संघाला आपल्याला हा खेळाडू विकत घ्यायचा नव्हता असं लक्षात आलं. पण तोपर्यंत लिलाव पूर्ण झाल्याची घोषणा करण्यात आलेली आणि पुढच्या खेळाडूचा लिलाव सुरु झालेला. आयपीएल 2024 च्या लिलावकर्त्या मलिका सागर यांना सुद्धा पंजाबच्या संघााने केलेल्या या खरेदीचं आश्चर्य वाटलं. दुसरीकडे पंजाबच्या डेस्कवर सर्व मालक खेळाडूंची यादी पटापट तपासून पाहत काहीतरी गोंधळ झाल्याचं दर्शवत होते. मात्र पंजाबला त्यावेळेस पश्चाताप झाला तरी त्यांनी या शशांकला संघात घेतल्याची घोषणा सोशल मीडियावरुन केली होती. नाव सारखं असल्याने हा गोंधळ झाल्याचं संघाने म्हटलं होतं.


पंजाबने दिलेलं स्पष्टीकरण


"पंजाब किंग्सच्या संघाला हे स्पष्ट करायचं आहे की शशांक सिंह हा कायमच आमच्या टार्गेट लिस्टवर होता. लिलाव होणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये एकाच नावाचे दोन खेळाडू असल्याने गोंधळ झाला. मात्र आम्ही योग्य शशांकची निवड केली आहे आणि तो आमच्या संघात असल्याचा आम्हाला आनंद आहे. तो आमच्या यशात नक्कीच योगदान देईल," असा विश्वासं संघ व्यवस्थापनाने एक्स (पूर्वीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन व्यक्त केला होता.



20 लाखात झाली खरेदी


शशांकला पंजाबच्या संघाने 20 लाखांच्या बेस प्राइजला संघात घेतलं. शशांकचं नाव लिलावादरम्यान जाहीर झालं तेव्हा प्रिती झिंटाने खरेदीसाठी इच्छा असल्याचं निशाण दाखवलं. चर्चा केल्यानंतरच प्रितीने ही कृती केली होती. मात्र या शशांकला संघात घेण्यासाठी इतर कोणत्याही संघाने बोली न लावल्याने त्याला लगेच लिलाव झाला होता. 


शशांकची कामगिरी कशी?


शशांक सिंहने 58 घरगुती टी-20 सामने खेळले असून त्यात 754 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 137.34 इतका आहे. तो छत्तीसगडच्या संघामधील बॅटींग ऑलराऊण्डर आहे. यापूर्वी शशांकला सनरायझर्स हैदराबा, दिल्ली डेअरडेव्हल्स, राजस्थान रॉयल्सच्या संघाने विकत घेतलं होतं.