विराटच्या 59 बॉल 83 धावांमुळे RCB हरली म्हणणाऱ्यांना गावसकरांनी झापलं; म्हणाले, `त्याने 120 धावा..`
IPL 2024 KKR Beat RCB Sunil Gavaskar Slams Virat Kohli Critics: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने आपल्या तिसऱ्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना 180 हून अधिक धावांचं आव्हान कोलकात्यासमोर ठेवलं होतं. कोलकात्याने हे आव्हान सहज गाठलं.
IPL 2024 KKR Beat RCB Sunil Gavaskar Slams Virat Kohli Critics: विराट कोहली सध्या सुरु असलेल्या इंडियन प्रिमिअर लीगच्या 17 व्या पर्वामध्ये धडाकेबाज कामगिरी करताना दिसत आहे. त्याने शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यामध्ये 83 धावांची खेळी केली. हे कोहलीचे सलग दुसरे अर्धशतक ठरलं. विराटने 59 बॉलमध्ये 4 चौकार आणि 4 षटकराच्या मदतीने ही महत्त्वपूर्ण खेळी केली. मात्र विराटच्या दमदार खेळीनंतरही बंगळुरुच्या संघाचा 7 विकेट्सने पराभव झाला. विराट नक्कीच केकेआरविरुद्ध शतक झळकावेल असं वाटत होतं. मात्र 20 ओव्हरचा खेळ संपेपर्यंत तो 83 धावांवर नाबाद राहिला.
विराट संथ खेळल्याचा आरोप
सलामीला आलेला विराट अगदी शेवटपर्यंत नाबाद राहिला. मात्र बंगळुरुच्या फलंदाजीच्या वेळी शेवटच्या 5 ओव्हरमध्ये म्हणावी तशी फटकेबाजी विराटने केली नाही, धावगती संथ राखली अशी टीका या सामन्याच्या निकालानंतर होत आहे. अनेकांनी सोशल मीडियावरुन विराटची खेळी संथ होती, त्याच्या खेळीचा संघाला काहीच फायदा झाला नाही असं म्हणत त्याला टार्गेट केलं. मात्र ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि समालोचक सुनिल गावसकर यांनी विराटच्या संथ खेळीमुळे बंगळुरुचा पराभव झाला असे अकलेचे तारे तोडणाऱ्यांना सडेतोड शब्दांमध्ये सुनावलं आहे.
गावसकर यांनी केली पाठराखण
बंगळुरुच्या एम. चिन्नस्वामी स्टेडियमवर झालेल्या आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्यामध्ये दोन्ही संघांकडून जोरदार फटकेबाजी करण्यात आली. विराट कोहली 15 वी ओव्हर संपली तेव्हा 43 बॉलमध्ये 62 धावांवर खेळत होता. शेवटच्या पाच ओव्हरमध्ये विराट चाचपडताना दिसला. त्याला शेवटच्या पाच ओव्हरमध्ये 16 बॉलमध्ये केवळ 21 धावा करता आल्या. विराटची ही संथ खेळी पाहून अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे. मात्र ही टीका ऐकून गावसकर चांगलेच संतापले आहेत. गावसकर यांनी अगदी उदाहरण देत कोहली डावाच्या शेवटची संथ गतीने का खेळला हे समजावून सांगितलं आहे. तसेच मी सांगितलं त्याप्रमाणे घडलं असतं तर विराटने 83 नाही 120 धावा एकट्याने केल्या असत्या असा दावाही गावसकर यांनी केला.
नक्की वाचा >> पाकिस्तानी क्रिकेटपटूने उडवली IPL ची खिल्ली! 523 धावा, 38 Sixes पाहून म्हणाला, 'हे तर सपाट पीच अन्...'
...तर विराटने 120 धावा केल्या असत्या
"विराट कोहली एका काय करणार, तुम्हीच सांगा," असं म्हणत गावसकर यांनी विराटच्या संथ खेळीच समर्थन केलं आहे. "कोणीतरी विराटला मैदानात टिकून राहत साथ द्यायला हवी होती. या सामन्यामध्ये समोरच्या बाजूला कोणी त्याला साथ दिली असती तर त्याने 83 धावांऐवजी 120 धावांची खेळी केली असती. हा एक सांघिक खेळ आहे. हा खेळ एकट्याचा नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. आज त्याला कोणाचीच साथ मिळाली नाही," असं म्हणत गावसकर यांनी टीकाकारांचे कान टोचले. विशेष म्हणजे विराट वगळता आरसीबीच्या संघातील एकाही खेळाडूला 40 धावांचाही टप्पा गाठता आला नाही.
नक्की वाचा >> हार्दिक पंड्यासाठी Warning! 'मुंबईमध्ये खेळशील तेव्हा...'; रोहितच्या नावाने डिवचण्यावरुन इशारा
आपल्या तीन सामन्यांपैकी आरसीबीने दोन सामने गमावले आहेत. घरच्या मैदानावर खेळताना सामना गमावणारी आरसीबी ही यंदाच्या पर्वातील पहिलीच टीम ठरली आहे.