IPL 2024 Warning To Hardik Pandya About Mumbai Match: मुंबई इंडियन्ससाठी इंडियन प्रिमिअर लीगचं 2024 च्या पर्वाची सुरुवात फारशी समाधानकारक झालेली नाही. गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यांमध्ये नवा कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाला पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. विशेष म्हणजे या दोन्ही सामन्यांमध्ये मैदानातील क्रिकेट चाहत्यांनी मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावाने चिडवलं. अनेकांनी नाणेफेक सुरु असतानाच हुर्यो उडवली. हार्दिक पंड्याची मैदानातील वर्तवणूक आणि सामान्यासंदर्भातील दृष्टीकोनावरुन आजी-माजी खेळाडूंबरोबरच चाहत्यांकडूनही टीका होताना दिसत आहे. अशाताच एका माजी क्रिकेटपटूने हार्दिक मुंबईमध्ये कर्णधार म्हणून सामना खेळेल तेव्हा काय स्थिती असेल याबद्दलच भाकित व्यक्त केलं आहे.
भारताचा माजी कर्णधार मनोज तिवारीने मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्याची मुंबईमधील सामन्यात अधिक मोठ्या आवाजात हुर्यो उडवली जाईल अशी शक्यता व्यक्त केली आहे. मुंबईचा होम ग्राऊण्डवरील पहिला सामना 1 एप्रिल रोजी राजस्थान रॉयर्लविरुद्ध होणार आहे. याच सामन्यात हार्दिकला मोठ्या प्रमाणात चाहत्यांचा विरोध सहन करावा लागेल असं सांगताना मनोज तिवारीने हार्दिक हे हाताळण्यासाठी सक्षम असल्याचंही म्हटलं आहे. यंदाचं पर्व सुरु होण्याआधीच मुंबईच्या व्यवस्थापनाने गुजरात टायटन्सला 2022 मध्ये पहिल्याच पर्वात जेतेपद मिळवून देणारा आणि दुसऱ्या पर्वात अंतिम सामन्यापर्यंत घेऊन जाणाऱ्या हार्दिकला प्लेअर्स ट्रेडअंतर्गत संघात घेतलं.
विशेष म्हणजे तडकाफडकी रोहित शर्माला कर्णधारपदावरुन डच्चू देत हार्दिक पंड्याकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं. अहमदाबदच्या मैदानावर गुजरातच्या संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात हार्दिक टॉससाठी गेला असता त्याचं गृहराज्य असलेल्या गुजरातमध्येच त्याची हुर्यो उडवण्यात आली. असाच प्रकार हैदराबादमधील राजीव गांधी अंतरराष्ट्रीय स्टेडिमवर हैदराबादच्या संघाविरुद्ध खेळतानाही पाहायला मिळाला. त्यामुळेच पहिल्या सामन्यानंतरच मनोज तिवारीने हार्दिकला मुंबईत मोठा विरोध सहन करावा लागेल असं चिन्ह दिसत असल्याचं सूचित केलं आहे.
नक्की वाचा >> 'हार्दिक संघात नसणं गुजरातला फायद्याचं, कारण आता कोणी...'; क्रिकेटपटूचं रोखठोक मत
"त्याचं मुंबईत कसं स्वागत होतं हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. माझ्या मते तिथे अधिक मोठ्या आवाजात त्याची खिल्ली उडवली जाऊ शकते. यामागील कारण म्हणजे क्रिकेटचे चाहते, मुंबईच्या संघाचे चाहते असो किंवा अगदी रोहितचे चाहते असले तरी कोणालाच कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे सोपवलं जाईल असं वाटलं नव्हतं," अशी प्रतिक्रिया मनोज तिवारीने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये नोंदवली. "रोहितने मुंबईला पाच वेळा चषक मिळवून दिल्यानंतरही त्याला कर्णधारपद सोडावं लागलं. यामागील कारणं काय आहेत मला ठाऊक नाही. मात्र चाहत्यांना हा निर्णय आवडलेला नाही. त्याचा परिमाण तुम्हाला मैदानावर दिसणार हे सहाजिक आहे," असंही मनोज तिवारी म्हणाला.
नक्की वाचा >> IPL 2024 Points Table मध्ये राजस्थानचा रॉयल कारभार! मुंबईचं रँकिंग पाहून बसेल धक्का
मात्र एकीकडे पंड्याची खिल्ली उडवली जाईल असं सांगतानाच मनोज तिवारीने पंड्या ज्या पद्धतीने ही परिस्थिती हाताळत आहे ते कौतुकास्पद असल्याचं म्हटलं आहे. "मी जितका त्याला ओळखतो आणि मागील काही दिवसांपासून टीव्हीवर त्याला पाहत आहे त्यावर असं वाटतं की त्याची खिल्ली उडवली तरी त्याने आपला संयम कायम राखला आहे. हे एक चांगला खेळाडू असण्याचं लक्षण आहे," असं मनोज तिवारी म्हणाला. मनोज तिवारी पश्चिम बंगाल राज्याचा क्रीडा मंत्रीही आहे. मुंबईत खेळताना हार्दिक पंड्याला आजूबाजूच्या आवाजाकडे दुर्लक्ष करुन आपल्या खेळावर लक्ष्य केंद्रित करावं लागणार आहे. तो 1 जून पासून अमेरिकेत सुरु होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी तयार होण्याच्या दृष्टीने याकडे पाहत असावा असंही मनोज तिवारीने म्हटलं.