IPL 2024: सध्याच्या हंगामात पाचवेळा आयपीएल स्पर्धा जिंकलेल्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आलं आहे. मुंबई इंडियन्सने पाचवेळा संघाला विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार रोहित शर्मालाच कर्णधारपदावरुन हटवलं आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, क्रिकेट चाहत्यांमध्ये हाच चर्चेचा विषय आहे. गुजरात टायटन्समधून ट्रेड करत संघात घेतलेल्या हार्दिक पांड्याला कर्णधार कऱणं अनेकांना रुचलेलं नाही. 2021 मध्ये हार्दिक पांड्या मुंबई संघाला सोडून गुजरातमध्ये सामील झाला होता. यानंतर त्याने पहिल्याच वर्षी गुजरातला जेतेपद मिळवून दिलं होतं. या सर्व चर्चांदरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा आणि मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू पार्थिव पटेलने एक गौप्यस्फोट केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"रोहित नेहमी आपल्या खेळाडूंच्या पाठीशी भक्कमपणे उभा असतो. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या आहेत. बुमराह 2014 मध्ये मुंबई इंडियन्स संघात आला होता. 2015 मध्ये त्याने आपला पहिला हंगाम खेळला. पण तो चांगली कामगिरी करु शकला नव्हता. यानंतर त्याला मध्यातच रिलीज करणार होते. पण रोहित त्याच्या पाठीशी उभा राहिला आणि तो कामगिरी करेल असा विश्वास दाखवत संघात कायम ठेवलं. त्यानंतर 2016 पासून त्याने किती जबरदस्त कामगिरी केली आहे हे पाहू शकतो," असं पार्थिव पटेलने सांगितलं आहे. तो जिओ सिनेमावरील 'Legends Lounge Show' कार्यक्रमात बोलत होता. 


"हार्दिक पांड्यासोबतही असंच झालं आहे. 2015 मध्ये तो संघात आला. पण 2016 मध्ये तो चांगली कामगिरी करु शकला नाही. जेव्हा तुम्ही अनकॅप खेळाडू असता तेव्हा फ्रँचाइजी तुम्हाला लगेच रिलीज करतं. यानंतर तुम्ही त्या खेळाडूला पुन्हा संघात घेण्याआधी तो रणजी आणि इतर स्थानिक स्पर्धेत कसा खेळतो हे पाहता. पण रोहितने तसं होऊ दिलं नाही. त्यामुळे आज हे दोन्ही खेळाडू आज जे काही आहेत ते आहेत," असं पार्थिव पटेलने म्हटलं आहे. 



"आंतरराष्ट्रीय खेळाडूंबद्दल बोलायचं झाल्यास मी जोस बटलरबद्दल बोलू शकतो. 2017 मध्ये रोहितला तो ओपनर म्हणून चांगला खेळू शकतो असं वाटलं. यानंतर रोहित शर्मा खालच्या क्रमांकावर गेला आणि मी जोससर ओपनिंग केली," असा खुलासा पार्थिव पटेलने केला आहे. 


यादरम्यान हार्दिक पांड्याने पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स संघात परतल्याचा आनंद व्यक्त केला आहे. आपल्या जुन्हा मित्रांना भेटून जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याचं त्याने म्हटलं आहे. मुंबई इंडियन्सने त्याचा सर्वांना भेटतानाचा व्हिडीओही शेअर केला आहे.