IPL 2024 : राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, 10 कोटींचा गोलंदाज स्पर्धेतून बाहेर
IPL 2024, Rajasthan Royals : आयपीएलचा सतरावा हंगाम येत्या 22 मार्चपासून सुरु होतोय. त्याधीच राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. राजस्थानचा स्टार वेगवान गोलंदाज सतराव्या हंगामातून बाहेर पडलाय.
IPL 2024, Rajasthan Royals : आयपीएलचा सतरावा हंगाम सुरु व्हायला आता काही दिवसांचा अवधी बाकी राहिलाय. येत्या 22 मार्चपासून दहा संघांमध्ये आयपीएलची चुरस रंगेल. गतविजेती चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरदरम्यानच्या (RCB) सामन्याने आयपीएल 2024 ला सुरुवात होईल. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतरा दिवसांचा पहिला टप्पा जाहीर करण्यात आला असून यात 21 सामने खेळवले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात प्रत्येक संघ सात सामने खेळणार आहे. आयपीएलसाठी (IPL 2024) सर्व संघ सज्ज होत असतानाच राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसला आहे.
राजस्थान रॉयल्सला धक्का
आयपीएलच्या सुरुवातीलाच राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) मोठा धक्का बसला आहे. राजस्थानचा स्टार वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) आयपीएलच्या सतराव्या हंगामातून बाहेर पडलाय. बीसीसीआयने मेडिकल बुलेटिन जारी करत ही माहिती दिली आहे. 23 फेब्रुवारी 2024 ला प्रसिद्ध कृ्ष्णाच्या गुडघ्यावर (Left proximal quadriceps tendon) शस्त्रक्रिया झाली. सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून लवकरच तो बंगळुरुच्या नॅशनल क्रिकेट अकादमीत सराव सुरु करेल असं बीसीसीआयने म्हटलंय. त्यामुळे प्रसिद्ध कृष्णा आयपीएल 2024 मध्ये खेळणार नाही हे स्पष्ट झालं आहे.
प्रसिद्ध कृष्णावर 10 कोटींची बोली
2022 च्या हंगामात आयपीएल ऑक्शनमध्ये प्रसिद्ध कृष्णाला लॉटरी लागली होती. प्रसिद्ध कृष्णाची बेस प्राईज 1 कोटी रुपये इतकी होती. पण त्यावेळी त्याचा फॉर्म पाहाता राजस्थान रॉयल्सने त्याला 10 कोटी बोली लावत आपल्या संघात घेतलं. प्रसिद्ध कृष्णाने 2018 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं. कोलकाता नाईट रायडर्सने 20 लाख रुपयात त्याला संघात घेतलं होतं. पण केवळ पाच वर्षात प्रसिद्ध कृष्णा 10 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. आयपीएल 2022 मध्ये प्रसिद्ध कृष्णा 17 सामने खेळला. यात त्याने 19 विकेट घेतल्या होत्या.
प्रसिद्ध कृष्णा आयपीएलमध्ये आतापर्यंत 51 सामने खेळला आहे. यात त्याने 49 विके घेतल्या आहेत.
प्रसिद्ध कृष्णाची क्रिकेट कारकिर्द
प्रसिद्ध कृष्णाने 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. भारतासाठी तो आतापर्यंत केवळ 14 एकदिवसीय सामने खेळला आहे. यात त्याने 23.92 च्या अॅव्हरेजने 25 विकेट घेतल्या आहेत.
राजस्थान रॉयल्सचा संघ
संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, शिमरोन हेटमायर, यशस्वी जायसवाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, डोनोवन फरेरा, कुणाल राठोड, रविचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, प्रसिद्ध कृष्णा, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, एडम जम्पा, अवेश खान, रोवमैन पॉवेल, शुभम दुबे, टॉम कोहलर-कॅडमोर, आबिद मुश्ताक आणि नंद्रे बर्गर