SRH विरुद्धच्या पराभवाबद्दल बोलताना पंतने मान खाली घातली! गावस्कर म्हणाले, `तू कधीच शरमेनं..`
Gavaskar Message To Rishabh Pant: दिल्लीच्या संघाला हैदराबादच्या संघाने पराभूत केलं आहे. या पराभवामुळे दिल्लीने यंदाच्या स्पर्धेतील पाचवा सामना गमावला आहे. दिल्लीच्या संघाला केवळ 3 सामन्यांमध्ये विजय मिळवता आहे. दिल्लीची प्लेऑफची वाट बिकट झाली आहे.
Gavaskar Message To Rishabh Pant: इंडियन प्रिमिअर लिगच्या 35 व्या सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा कर्णधार ऋषभ पंत फारच निराश दिसून आला. सनरायझर्स हैदराबादच्या संघाविरुद्धच्या या सामन्यात दिल्लीचा 67 धावांनी पराभव झाला. मात्र या सामन्यात सर्वच पातळ्यांवर दिल्लीच्या संघाने हैदराबादकडून सपाटून मार खाल्ल्याचं पाहायला मिळालं. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या संघाने तब्बल 266 धावा कुटल्या. 20 ओव्हरमध्ये 7 गड्यांच्या मोबदल्यात हैदराबादने उभारलेला धावांचा डोंगर सर करण्याचा दिल्लीचा प्रयत्न अपयशी ठरला. दिल्लीचा संपूर्ण संघ 199 धावांवर तंबूत परतला. या पराभवामुळे दिल्लीचा संघ पाचव्यांदा सामना पराभूत झाला असून त्यांना यंदा केवळ 3 सामने जिंकता आले आहेत. ते पॉइण्ट्स टेबलमध्ये 10 पैकी 7 व्या स्थानी आहेत. नवी दिल्लीसाठी यंदाचं पर्व फारच चढ उतार असलेलं ठरलं आहे. 67 धावांनी पराभव झाल्याने दिल्लीच्या संघाची प्लेऑफची वाट अधिक बिकट झाली आहे.
सामना कशामुळे हारले? पंत म्हणाला...
हैदराबादकडून पराभूत झाल्यानंतर पंतने, पॉवर प्लेमध्ये हैदराबादने तुफान कामगिरी केल्याचं म्हटलं. पहिल्या 6 ओव्हरमध्ये हैदराबादच्या संघाने 125 धावा कुटल्या त्यावेळी ट्रॅव्हीस हेड आणि अभिषेक शर्मा गोलंदाजांवर तुटून पडले होते. हाच टप्पा सामन्याचा कल पालटणारा ठरल्याचं पंत म्हणाला. "पॉवर प्लेमध्ये दोन्ही संघांनी केलेल्या खेळातील फरक निर्णायक ठरला असं मला वाटलं. आम्ही संपूर्ण सामन्यात याच गोष्टीचा पाठलाग करत राहिलो. हा सर्वात मोठा फरक ठरला. आम्ही यामधून दमदार पुनरागमन करु आणि आमचे विचार अधिक स्पष्ट होतील अशी अपेक्षा आहे," असं पंत म्हणाला. दिल्लीचा संघ त्यांच्या घरच्या मैदानावर खेळण्यासंदर्भात उत्सुक होता. मात्र हेड आणि शर्माने केलेल्या 131 धावांची तुफान पार्टनरशीप यावर विरझण घालणारी ठरली.
आमचा तो अंदाज चुकला...
पराभवानंतर पंतने अरुण जेटली स्टेडियमवर दव इतकं परिणामकारक ठरु शकतो याचा अंदाज घेण्यात चूक झाल्याचंही मान्य केलं. नाणेफेक जिंकल्यानंतर पंतने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. "पहिल्यांदा गोलंदाजी करण्यामागील एकमेव कारण म्हणजे दव पडेल असा आमचा अंदाज होता. मात्र तसं काही घडलं नाही. आम्ही विचार केला होता की आम्ही त्यांना 220-230 पर्यंत रोखू शकतो असतो तर आम्हाला विजयाची संधी होती," असं पंत म्हणाला.
नक्की वाचा >> 67 धावांनी पराभूत झालेल्या दिल्लीच्या संघाची मुंबई इंडियन्सनं उडवली खिल्ली! म्हणाले, 'आता तुम्हाला...'
पंत मान खाली घालून उभा होता तर...
पराभवामुळे पंत निराश होऊन मान खाली घालून बोलत असल्याचं पाहून माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी प्रश्न विचारतानाच त्याला धीर दिला. "तू कधीच शरमेनं मान खाली घालून उभं रहावं असं मला वाटत नाही. अजून बरेच सामने बाकी आहेत. त्यामुळे नेहमी हसत राहा," असं गावसकर म्हणाले. त्यावर पंतने, "मी पूर्ण प्रयत्न करेन, सर!" असं उत्तर दिलं.
दोन मोठे विक्रम हैदराबादच्या नावे
या सामन्यामध्ये धावसंख्येसंदर्भातील 2 महत्त्वाचे विक्रम आपल्या नावे केले. यामध्ये सर्वाधिक वेळा 250 धावांचा टप्पा ओलांडणारा संघ होण्याचा बहुमान मिळवण्याबरोबरच पॉवरप्लेमधील सर्वाधिक विक्रमाची नोंदही हैदराबादच्या संघाने केली. पहिल्या 6 ओव्हरमध्ये सनरायझर्सच्या संघाने तब्बल 125 धावा केल्या. विशेष म्हणजे या ओव्हरमध्ये त्यांनी एकही विकेट गमावली नाही. पॉवर प्लेमध्ये कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.