67 धावांनी पराभूत झालेल्या दिल्लीच्या संघाची मुंबई इंडियन्सनं उडवली खिल्ली! म्हणाले, 'आता तुम्हाला...'

Mumbai Indians Troll Delhi Capitals: मुंबईच्या संघाविरुद्ध पहिल्यादा सनरायझर्स हैदराबादच्या संघाने 250 धावांचा टप्पा ओलांडला होता. शनिवारी त्यांनी सर्वाधिक वेळा 250 हून अधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे करुन घेतल्यानंतर मुंबईने दिल्लीला केलं ट्रोल.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 21, 2024, 09:25 AM IST
67 धावांनी पराभूत झालेल्या दिल्लीच्या संघाची मुंबई इंडियन्सनं उडवली खिल्ली! म्हणाले, 'आता तुम्हाला...' title=
मुंबईच्या संघाने सनरायझर्सला केलं ट्रोल

Mumbai Indians Troll Delhi Capitals: फलंदाजीचा विचार केल्यास सनरायझर्स हैदराबादच्या संघासाठी यंदाचं इंडियन प्रिमिअर लीगचं पर्व सर्वात यशस्वी पर्व ठरत असल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. आयपीएलच्या इतिसाहामध्ये सर्वाधिक वेळा 250 हून अधिक धावांचा टप्पा ओलांडणाऱ्या संघाचा विक्रम सनरायझझर्सने स्वत:च्या नावे करुन घेतला आहे. विशेष म्हणजे या सर्व धावसंख्या 2024 च्या पर्वातच केल्यात. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने यंदाच्या पर्वात सर्वात आधी 250 धावांचा टप्पा मुंबईविरुद्धच्या सामन्यात ओलांडला होता. 27 मार्च रोजी राजीव गांधी अंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यामध्ये सनरायझर्स हैदराबादने 250 धावांचा टप्पा ओलांडून 20 ओव्हरमध्ये 277 धावा कुटल्या. 3 गड्यांच्या मोबदल्यात केलेला हा स्कोअर त्यावेळी आयपीएलमधील सर्वात मोठी धावसंख्या ठरला.

महिन्याभरातच सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम अन् आता...

त्यानंतर महिन्याभराच्या आतच सनरायझर्सने हा आपलाच विक्रम मोडीत काढला. 15 एप्रिल रोजी बंगळुरुमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाविरुद्ध हैदराबादच्या संघाने 287 धावांचा डोंगर उभा केला. ही धावसंख्याही 3 गड्यांच्या मोबदल्यातच उभारली हे विशेष. आयपीएलमधील सर्वात मोठ्या धावसंख्येचा विक्रम नोंदवल्यानंतर शनिवारी सनरायझर्स हैदराबादच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सच्या संघाविरुद्ध पुन्हा तुफान फलंदाजी केली. दिल्लीविरुद्ध अरुण जेटली स्टेडियममधील सामन्यात सनरायझर्सने 266 धावांचा डोंगर उभा केला. दिल्लीविरुद्धचा हा सामना हैदराबादने 67 धावांनी जिंकला. मात्र पहिल्याच डावात सनरायझर्सने एवढी मोठी धावसंख्या उभारल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघाने हैदराबादच्या संघाला एक्स (ट्विटरवरुन) ट्रोल केलं आहे.

मुंबईने काय म्हटलं...

सनरायझर्सच्या संघाने आयपीएलमधील 27 व्या सामन्यामध्ये मुंबईला पराभूत केल्यानंतर दिल्लीच्या संघाने ट्वीटरवरुन "सनरायझर्सच्या फलंदाजांना एक प्रश्न आहे की, त्यांनी ब्रेकफास्टमध्ये काय खाललं होतं?" अशी पोस्ट केलेली. शनिवारच्या सामन्यातील सनरायझर्सची कामगिरी पाहून मुंबई इंडियन्सने याच पोस्टला रिप्लाय केला आहे. मुंबईच्या संघाने स्टॅण्डअप कॉमेडियन अभिषेक उपमन्यूचं एक मीम शेअर केलं आहे. यावर अभिषेकच्या स्कीटमधील, 'आ गया स्वाद?' हे शब्द लिहिलेले आहेत. म्हणजेच आता तुम्हाला कळली असेल याची (सनरायझर्स हैदराबादच्या धुलाईची) चव असं मुंबईने म्हटलं आहे.

सर्वाधिकवेळा 250+ धावा

शनिवारच्या सामन्यात सनरायझर्सचा सलामीवीर ट्रॅव्हीस हेडने 32 बॉलमध्ये 89 धावा केल्या. अभिषेक शर्माने 12 बॉलमध्ये 46 धावा केल्याने संघाला 7 विकेट्सच्या मोबदल्यात 266 धावा केल्या. पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कोणत्याही संघाने 3 वेळा 250 हून अधिक धावा केल्या. 

पॉवरप्लेमध्ये विक्रमी कामगिरी

पहिल्या 6 ओव्हरमध्ये सनरायझर्सच्या संघाने तब्बल 125 धावा केल्या. विशेष म्हणजे या ओव्हरमध्ये त्यांनी एकही विकेट गमावली नाही. पॉवर प्लेमध्ये कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.