पुढच्या वर्षीच्या आयपीएल वेळापत्राकत बदल, हे आहे कारण
आयपीएल जगभरातल्या क्रिकेटपटू आणि चाहत्यांच्या आकर्षणाचं केंद्र बनला आहे.
मुंबई : आयपीएल जगभरातल्या क्रिकेटपटू आणि चाहत्यांच्या आकर्षणाचं केंद्र बनला आहे. फक्त भारतीयच नाही तर आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रत्येक वर्षी आयपीएलची आतुरतेनं वाट पाहत असतात. आत्तापर्यंत प्रत्येकवर्षी आयपीएलची सुरुवात एप्रिलमध्ये होते तर शेवट मेमध्ये होतो. पुढच्या वर्षी मात्र आयपीएलच्या वेळापत्राकत बदल करण्यात आला आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केलं आहे. पुढच्या वर्षी आयपीएल २९ मार्च ते १९ मेपर्यंत होणार आहे. इंग्लंडमध्ये ३० मेपासून वर्ल्ड कप सुरु होत असल्यामुळे पुढच्या वर्षी आयपीएल लवकर होईल. सुरुवातीला भारत २ जूनला वर्ल्ड कपची पहिली मॅच खेळणार होता. पण लोढा समितीच्या नियमांनुसार आयपीएल मॅच आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये १५ दिवसांचा कालावधी असणं बंधनकारक आहे. म्हणून ही मॅच आता ५ जूनला होणार आहे.
भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेशी
२०१५ वर्ल्ड कप आणि २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी झाला होता. २०१९ वर्ल्ड कपमध्ये मात्र भारत पहिली मॅच दक्षिण आफ्रिकेशी खेळेल.
१६ जूनला पाकिस्तानशी लढत
१६ जूनला भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताचा एकदाही पराभव झालेला नाही. आत्तापर्यंत वर्ल्ड कपमध्ये झालेल्या ६ पैकी ६ मॅचमध्ये भारताचा विजय झालेला आहे. त्यामुळे हे रेकॉर्ड कायम ठेवण्यासाठी भारत मैदानात उतरेल. १९९२ साली झालेल्या वर्ल्ड कपप्रमाणे २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये सगळ्या टीम एकमेकांविरोधात खेळणार आहेत.