इंदूर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा पाच विकेटनं विजय झाला आहे. भारताच्या या विजयाचे शिल्पकार ठरले ते रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि हार्दिक पांड्या. रोहितनं ६२ बॉल्समध्ये ७१ रन्स केले तर अजिंक्य रहाणेनं ७६ बॉल्समध्ये ७० रन्स केले. रोहित आणि अजिंक्यनं पहिल्या विकेटसाठी १३९ रन्सची पार्टनरशीप केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चौथ्या क्रमाकांवर बॅटिंगला आलेल्या हार्दिक पांड्यानं ७२ बॉल्समध्ये ७८ रन्सची खेळी केली. पांड्याच्या या खेळीमध्ये ५ फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता. यामुळे भारतानं ४७.५ ओव्हरमध्ये पाच विकेट गमावून २९४ रन्स करून विजय मिळवला.


रोहित, अजिंक्य आणि हार्दिकमुळे भारताचा विजय झाला असला तरी ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टिव्ह स्मिथचं मत मात्र वेगळं आहे. भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहनं शेवटच्या काही ओव्हर्समध्ये केलेल्या बॉलिंगमुळे आमचा पराभव झाल्याचं स्मिथ म्हणाला.


बुमराह आणि भुवनेश्वर हे सध्या शेवटच्या काही ओव्हर्समध्ये बॉलिंग करणारे सर्वोत्तम बॉलर्स आहेत. सुरुवातीच्या ३८ ओव्हर्समध्ये आमचा स्कोअर चांगला होता पण शेवटच्या १२ ओव्हर्समध्ये आम्ही चांगला खेळ केला असता तर स्कोअर ३३०-३४० रन्सपर्यंत पोहोचला असता आणि मॅचच्या निकालामध्ये फरक पडला असता, असं स्मिथ म्हणालाय.