लंडन : इंग्लंडविरुद्ध टी-२० सीरिज खेळत असणाऱ्या भारताला आणखी एक धक्का बसला आहे. दुखापतीमुळे टी-२० सीरिजमधून बाहेर असलेला बुमराह वनडे सीरिजही खेळू शकणार नाही. आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० वेळी बुमराहच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली होती. यामुळे आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०लाही बुमराह मुकला होता. भारतात परतण्याआधी लीड्समध्ये बुमराहवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता बीसीसीआयची वैद्यकीय टीम बुमराहवर उपचार करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जसप्रीत बुमराहऐवजी मुंबईच्या शार्दुल ठाकूरची वनडे टीममध्ये निवड करण्यात आली आहे. भारताची वनडे सीरिज १२ जुलैपासून सुरु होणार आहे. १४ जुलैला दुसरा आणि १७ जुलैला तिसरा सामना होणार आहे.


इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये बुमराहऐवजी दीपक चहरची निवड करण्यात आली आहे. शार्दुल ठाकूर हा सध्या भारतीय ए टीमसोबत इंग्लंडमध्येच आहे. वेस्ट इंडिज ए आणि इंग्लंड लायन्सविरुद्धच्या मॅचमध्ये शार्दुल आणि दीपकनं शानदार कामगिरी केली आहे.


बुमराहनं आत्तापर्यंत भारतासाठी ३५ टी-२०, ३७ वनडे आणि ३ टेस्ट मॅच खेळल्या आहेत. टी-२० मॅचमध्ये बुमराहनं १९.९३ च्या सरासरीनं आणि ६.७९ च्या इकोनॉमी रेटनं ४३ विकेट घेतल्या आहेत. ३७ वनडे मॅचमध्ये बुमराहनं २२.५० च्या सरासरीनं आणि ४.६४ च्या इकोनॉमी रेटनं ६४ विकेट घेतल्या आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये बुमराह पहिल्यांदाच टेस्ट सीरिज खेळला. ३ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये बुमराहनं २५.२१ च्या सरासरीनं १४ विकेट घेतल्या.