जय शाह ICC चे चेअरमन होणार? BCCI चं सचिवपद सोडण्याची शक्यता, फक्त त्यांना...
बीसीसीआयचे सचिव जय शाह (BCCI Secretary Jay Shah) यांनी जर आयसीसी चेअरमनपदाची (ICC Chairman) निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (International Council of Cricket) अध्यक्षपदासाठी नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होणार आहे. या महिन्यात आयसीसीची वार्षिक सर्वसाधारण सभा (ICC AGM) पार पडणार आहे. सध्या ग्रेग बार्कले (Greg Barclay) आयसीसीच्या अध्यक्षपदी आहेत. त्यांचा चार वर्षांचा कार्यकाळ आता संपत आहे. दरम्यान बीसीसीआयचे सचिव जय शाह (BCCI Secretary Jay Shah) आयसीसी अध्यक्षपदाच्या स्पर्धेत आघाडीवर आहेत. जर त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर बिनविरोध निवड होऊ शकते. नोव्हेंबर 2024 मध्ये ही निवडणूक होणार आहे.
बार्कले यांनी तीन वर्षांहून अधिक काळ आयसीसीचं प्रमुखपद भूषवलं आहे. बार्कले यांच्यानंतर जर जय शाह आयसीसीचे अध्यक्ष झाले तर ते सर्वात तरुण अध्यक्ष ठरतील. एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर यांच्यानंतर हे पद भूषवणारे ते तिसरे भारतीय असतील. मात्र या पदावर निवड झाल्यानंतर जय शाह यांच्यासमोर अनेक आव्हानंही उभी राहतील. याचं कारण त्यांना आयसीसीचे मुख्यालय दुबईत असल्याने तिथे स्थायिक व्हावं लागेल. ICC आपलं मुख्यालय मुंबईत हलवणार असल्याची चर्चा होती. पण Cricbuzz ने हे दावे फेटाळले आहेत.
Cricbuzz च्या वृत्तानुसार, जुलै महिन्यात कोलंबो येथे आयसीसीची वार्षिक सभा पार पडणार आहे. यावेळी नव्या अध्यक्षांच्या निवडीच्या कार्यक्रमासंबंधी निर्णय होऊ शकतो. जय शाह यांनी स्वतः निवडणूक लढवायची आहे की नाही यावर अधिकृत भाष्य केलेलं नाही. पण काही रिपोर्टनुसार त्यांना आयसीसीच्या कार्यपद्धतीत बदल करायचा आहे. विशेषत: युएसए आणि कॅरिबियन बेटांवर नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनावरील वादानंतर हे बदल ते करु इच्छित आहेत.
आयसीसीने अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सुधारणा केली आहे. नव्या अध्यक्षांसाठी याआधी दोन वर्षांचा कार्यकाळ होता. पण आता तो तीन वर्षं करण्यात आला आहे. तसंच ते फक्त एकदा पुन्हा निवडले जाऊ शकतात. तसंच जर जय शाह यांची अध्यक्षपदी निवड झाली तर ते 3 वर्ष पद भूषवतील. यानंतर 2028 मध्ये ते पुन्हा बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा पात्र असतील.
जय शाह यांनी 2009 मध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ क्रिकेट, अहमदाबादचे कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. नरेंद्र मोदी स्टेडियम प्रकल्पामागील प्रमुख व्यक्तींपैकी ते एक होते. नंतर 2015 मध्ये त्यांनी वित्त आणि विपणन समित्यांचे सदस्य म्हणून बीसीसीआयमध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये जय शाह यांची बीसीसीआयचे सचिव म्हणून निवड झाली. नंतर 2021 मध्ये आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदीही त्यांची नियुक्ती झाली. ICC चेअरमनपदाच्या स्पर्धेत शंकर रेंगानाथन हेदेखील प्रबळ दावेदार आहेत.